Anirudhha Shirke Header

विद्यार्थी मेळावा 1995 बॅच – एक वर्षपुर्ती

सोबत गुरु शिष्य या नात्याला उजाळा..

सर्वाधिक प्रामाणिक, तरल, स्वच्छ नाते म्हणजे गुरू शिष्याचे नाते. याचा श्रीगणेशा जिथे होतो, त्या शालेय जीवनातील गुरूंना व सवंगडयांना तब्बल 25 वर्षांनी भेटण्याची संधी, आमच्या मित्र-मैत्रिणींनी उपलब्ध करून दिली. 9 जुन 2019 रोजी या भेटीचा योग आला होता.

शारीरिक आकारमानात बरेच बदल झालेले हरहुन्नरी शालेय मित्रमैत्रिणी यांनाही या प्रदीर्घ कालानंतर भेटत होतो. सध्या तब्बल चाळीशीत असुनही गुरूजणांनी ‘बाळा, बछडा’ अशी प्रेमाने हाक मारून, गालावर हात फिरवत कौतुक केले आणि जणु आकाश ठेंगणे वाटु लागले.

निवृत्तीनंतर ज्या मातीचा स्पर्श आपण मुकलो आहोत, एकेकाळी जिथे आपण ज्ञानदानाच्या क्षेत्रात हुकुमत गाजवली त्या प्रांगणात, आपल्याला ढोल, ताश्यांच्या🥁 गजरात कोणी स्वागत करेल अशी कल्पना नसलेले शिक्षकवृंदही मनातुन आनंदी झाले होते.

कार्यक्रमाची औपचारिकता सोडून दिल्यास प्रत्येकाच्या मनात एक विश्वास, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम ओतप्रोत भरले गेले. आपल्या शिक्षकांप्रती असलेला आदराचा सुगंध सगळीकडे पसरला होता. तसेच एका छानश्या रोपट्याला खतपाणी घालुन त्याची उत्तम वाढ झाल्यावर चेहरयावर ओसंडून वाहणारा अभिमान प्रत्येक शिक्षकांच्या ठायी दिसत होता.

अशा प्रसंगी काही नाती अशीच टिकावीत, हा सहवास असाच वाढत जावा हि भावना मनात निर्माण झाल्याशिवाय राहवत नाही.
म्हणतात ना “नाती, मैत्री आणि प्रेम परिपुर्ण तिथेच होतात, जिथे त्यांना आदर आणि आपुलकी मिळते”.

आज तब्बल एक वर्ष सरले आहे, परंतु चित्रपटातील फ्लॅशबॅकप्रमाणे सगळे डोळ्यासमोर तरळत आहे. हे नाते, हा जिव्हाळा, ही आपुलकी कधीच तुटू नये अशीच भोळीभाबडी ईच्छा सर्वांच्याच मनात कायम दाटुन राहील हे निश्चित.

मला खात्री आहे अश्या भेटीने सगळीच मने तरूण झाली असतील. आजही प्रत्येक मनामध्ये सर्वांना पुन्हा भेटता येईल का? हा विचार मनात येत असेलच. संधी मिळताच त्यावर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न निश्चित करू.

आदरणीय गुरूजण, आपण आजवर दिलेल्या संस्कारांचा वारसा, विचारांची शिदोरी याबद्दल सर्व शिष्यमित्रद्वयीं तर्फे सर्व गुरूजणांचे मनपुव॔क आभार मानतो. आपला स्नेह असाच राहु द्यात.

सर्वच मित्र मैत्रिणींचे मनापासुन आभार !!

मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली, तुमच्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली…. “
आपल्या प्रेमाबद्दल सदैव ऋणी राहील.

सर्वांनी सुरक्षित रहा. काळजी घ्या