Anirudhha Shirke Header

तोंडी हिशोब

अवांतर..

“अरे शिवम गधड्या, त्याने १४ रुपये बरोबर दिलेत”. “अग आई पण आपण २०० पेजेसची नोटबुक घेतली ना, मग किती बॅलन्स रुपीज येतात “. ‘इंग्लिश मिडीयम मध्ये पोरग घातलं पण काही येत नाही. पाचवीला गेला तरी साधे तोंडी हिशोब जमत नाही’ – इति. अपेक्षाभंग झालेली आई. 

लिफ्टमधील हे संभाषण ऐकले आणि व्हाट्सअँप मध्ये मान घालून बसलेलो मी जरा भानावर आलो. प्रसंग साधाच होता पण वास्तववादी होता. आजची शिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञानाने भारावलेली परंतु मूलभूत कौशल्यांपासून दुर गेलेली आजची पिढी, यासंदर्भात सणसणीत चपराक होती.

खरंच का तोंडी हिशोब इतके गरजेचे आहेत ? बालचमूला ते कसे निटनिटके जमणार.  बर, सध्या वयाने मोठे असलेली आम्ही तरी सगळे हिशोब तोंडी करू शकतो का ? कधीकधी डिजिटल पेमेंटच्या जमान्यात विसरून गेलोय असे वाटत राहते.

 परवा बायको बरोबर बाजारहाट करायला गेलो होतो. पावशेर, अर्धा किलो, तीन पाव यासंदर्भात बायकोचा आणि त्या भाजीविक्रेत्यांचा हिशोबी संवाद काही केल्या समजत नव्हता. बायको जबरदस्तीने वेलभाजीचे जास्त माप करून घेत होती, तोही “मॅडम, कसे परवडणार. कांदा ८० रुपये किलो झालाय सांगत होता.” माझ्या डोक्यात कांदा आणि वेलभाजीचे हिशेबी नाते कसे काय काही काहीच जात नव्हते.

आमचा “प्राईड सुपर शॉपी” वाला शेठजीचेही तसेच, केवळ ८वी शिकलेला माणूस, दणादण हिशेब सांगत असतो आणि स्मार्टफोन वापरणाऱ्या गृहिणी त्याच्या सोबत हा हिशोब कसा झाला हे कॅलक्यूलेटर वर समजावून घेत असतात. त्याच्या गणिताच्या शिक्षकांना त्याचा निश्चित अभिमान वाटत असणार. 

त्या दिवशी तो “उंची लहान पण कीर्ती महान” व्याख्येतील सुदृढ दिसणारा फळवाला १ किलो १३० ग्रॅम चे अमुक पैसे आणि राहिलेल्या पैशात ७ ऐवजी ८ केळी घेऊन जाहो साहेब सहज म्हणाला. मी नंदीबैलासारखी मान डोलावून घेतले आणि ब्लूटूथ सेट करत गाडीत बसलो पण काही झेपले नव्हते.

सणासुदीच्या काळात कापड बाजारात लागणारे सेलचे गणित जबरदस्त गणिती तज्ज्ञाला देखील सोडवता येणार नाही हे नक्की, त्यासाठी बायको नावाचा तज्ज्ञच हवा.

लहानपणी घोकून घोकून पाठ केलेले पाढे कधी वापरायचे हा विचार नेहमीच मनात डोकावतो. बर ! त्या येत असलेल्या पाढ्यांचा अभिमान कुठे वाटलं माहित आहे “युरोप मध्ये”. एका मीटिंगमध्ये काही आर्थिक आकडेमोड चालू असताना ‘तेरी (१३) साती एक्क्यानव (९१)’ असे आठवून Ninety One(91) असे पटकन सांगितले तेव्हा सगळे अवाक होऊन माझ्याकडे पाहू लागले होते. आणि मी उगाच शर्ट ची  कॉलर tight करत होतो.

 एकंदर त्या शिवम आणि त्याची आई यांच्या संवादाने पुन्हा एकदा आयुष्यातील गणित या विषयाला छेडले. तसे पाहता “आयुष्याचे गणित सोडवणे सहज शक्य असते पण ते ज्याला जमले तोच खरे जीवन जगला असे म्हणावे लागेल”.