Anirudhha Shirke Header

चटका..

संध्याकाळची वेळ होती…  चुरगळलेला टी शर्ट नीट केला. आरशात छोट्या दाताच्या कंगव्याने केस नीट करत होतो. शेजारच्या निगडे काकुंच्या रेडिओवर अरजीत सिंगचे मस्त गाणे लागलेले होते. आज, माझे आणि रघ्याचे मराठी शाळेच्या मैदानावर मॅच खेळायला जायचे पक्के ठरले होते. मला तसा उशीरच झाला होता. पायात चप्पल घालतच होतो कि आईने आवाज दिला. “समीर, दळण घेऊन जा आणि तु थांबुन करूनच घेऊन ये. बारीक द्यायला सांग त्याला…”. आईची झपकन गुगली येऊन मी बोल्ड झालो होतो. कालच, मला आईने तिचे न ऐकल्याने, चांगलाच धुतला असल्याने, आईशी वाद घालण्यात अर्थ नव्हता.    

नाईलाजानेच दळणाची पिशवी उचलली आणि सायकलला लटकवली. दळणामुळे सायकलचा बॅलन्स जमणार नाही हे माहित असल्याने, सायकल हातात धरून, चालतच निघालो होतो. शेजारची कोमली मैत्रिणींबरोबर खेळत होती व माझ्याकडे बघुन हसली. आई नेमके अशाच वेळी दळणाला का पाठवते, याचा राग आला. 

कोपऱ्यावरच्या रमेशशेठच्या दुकानापुढे गेलो असेंन तेवढ्यात “माझा रामा सापडला,माझा रामा सापडला” असा आवाज कानावर आला.

विस्कटलेले पांढरे केस, लाल रंगाची साडी, कपाळावर ठसठशीत कुंकू, खांदयावर एक शबनम, डाव्या हाताला कसला तरी दोरा बांधलेला असा अवतार असलेली एक म्हातारी, ओरडत पळत येत होती. मी मागे, पुढे, इकडे, तिकडे पाहू लागलो परंतु रस्त्यात मी एकटाच उभा होतो आणि ती म्हातारी माझ्या दिशेनेच येत होती. मी तर पुरता गांगरून गेलो. काय करावे काही कळत नव्हते. सायकल सोडुन पळावे तर दळणाची वाट लागणार हे पक्के होते. तेवढ्यात तिने मला गाठले व माझ्या तोंडावरून हात फिरवु लागली.

“माझा रामा सापडला ग बाई. माझा रामा सापडला. लेकरा कुठे गेला होतास? किती शोधले रे मी तुला…” असे म्हणत ती माझ्या तोंडावरून हात फिरवत होती. तिच्या स्पर्शात प्रेमाचा ओलावा होता. क्षणभर, मी खरेच तिचा रामा आहे की काय असा विचार मनात आला. मला थोडी भिती वाटु लागली होती व कुतुहलही निर्माण झाले होते. काय होत आहे मला काहीच कळत नव्हते.

माझी अवस्था गल्लीतल्या माणसांच्या लक्षात आली होती. तितक्यात रमेशशेठची आई त्याच्या दुकानातुन बाहेर आली. गल्लीत तिचा दरारा होता. माझ्याजवळ येऊन तिने त्या म्हातारीला बाजुला ढकलले. ती माझ्या व म्हातारीच्यामध्ये उभी राहिली. माझ्यासाठी हा जणु चित्रपटाचाच सीन होता. “कोण ग तु ? आमच्या पोराला का त्रास देतीस? पोलिसांना बोलवु का ?” रमेशशेठच्या आईने दरडावतच तिला विचारले.

“हा..हा माझा मुलगा रामा आहे. ये रामा, माझ्याकडे ये. माझ्या सोन्या कुठ होतास रे…” ती म्हातारी परत सुरू झाली. तिला मला जवळ घ्यायचेच होते. पण रमेशशेठच्या आईपुढे तिचे काही चालेना. या सगळ्यात मी मात्र पुरता घामाघुम झालो होतो. “ओ ..ओ आज्जी, काही बडबडु …नका. मी ..मी समीर नखाते आहे. नगरपालिकेच्या शाळेत नववी ब तुकडीत..” जणु एखाद्याने मुलाखतीसाठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे मी बोलत होतो.

एव्हाना गल्लीतली माणसे जमा झाली होती. माझी आईही तिथे आली. सगळ्यांनी समजावुन, धमकावुन पाहिले. पण ती म्हातारी काही ऐकेना. रमेशशेठ पोलिसांना फोन लावण्याचा प्रयत्न करायला लागले. तेवढ्यात “बाजुला सरका, बाजुला सरका..” आवाज कानावर पडला. टी शर्ट व जीन्स घातलेली दोन माणसे गर्दीतुन वाट काढत पुढे आली.

“आई, कुठे गेली होतीस. इकडे कशी आलीस. किती शोधले तुला. चल बघु घरी.” त्यातला एकजण त्या म्हातारीला म्हणाला. “अरे दादा, हा बघ आपला रामा..आपला रामा सापडला रे. माझ लेकरू सापडल. बघ, बघ कसा वाळला आहे.” म्हातारीचे हे वाक्य संपताच सगळे माझ्याकडे बघु लागले. त्या कोमली व तिच्या मैत्रिणींना म्हातारीच्या शेवटच्या वाक्यावर जाम हसु आले होते.

आता रमेशशेठ पुढे झाले व त्या माणसांशी बोलु लागले. थोड्या वेळात सगळा उलगडा होऊ लागला. त्या म्हातारीला तीन मुले होती. खुप वर्षापुर्वी तिचा धाकटा मुलगा किरकोळ कारणांमुळे घरातुन रागावुन बाहेर पडला. तो काही परतलाच नाही. त्यांनी खुप शोधले. परंतु त्याचा काही पत्ता लागला नाही. त्याच्या अकस्मात जाण्याने ही माऊली कायमची खचली होती.

“आमचा भाऊ घरातुन गेला त्यावेळी साधारण या मुलाच्या वयाचाच होता. तेव्हापासुन आई, असा कोणी मुलगा दिसला की त्याला रामा म्हणते. तसे आम्ही तिला बाहेर सोडत नाही. पण आज रामनवमी असल्याने तिला रामाच्या मंदिरात घेऊन गेलो होतो. पुरूषांची रांग जास्त असल्याने आम्हाला वेळ लागला. बाहेर येऊन पाहतो तर आई गायब. शोधत शोधत इथपर्यंत पोहोचलो. झाल्या प्रकाराबद्दल, आम्ही तुमची माफी मागतो. बाळा तु घाबरला नाहीस ना?” त्या माणसाने माझ्या खांद्यावर हात टाकत विचारले. मी ही चेहऱ्यावर समजुतदारपणा दाखवत, नाही म्हणुन मान डोलावली.

आता गर्दी पांगली होती. बाबाही कामावरून परतले होते. त्यांनी माझ्याकडुन सायकल काढुन घेतली. मी, ती म्हातारी व तिच्या दोन्ही मुलांना पाहत होतो. तेवढ्यात म्हातारी पुन्हा धावत माझ्याकडे झेपावली व माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवुन ” माझा रामा..” म्हणाली. आता मात्र माझ्या अंगावर सरकन काटा आला… ती माणसे तिला पुन्हा ओढुन घेऊन जाऊ लागली. मी त्यांच्याकडे पाहत तसाच उभा होतो.

आज रामनवमीला, नियतीने एका मातेला तिच्या रामाबरोबर क्षणभर भेट घडवली होती. तिला काही क्षणांसाठी का होईना, आनंद मिळाला होता. खरेतर यात समाधान मानावे की, हे सारे मृगजळ आहे, खरा रामा अजुन वनवासातुन आलाच नाही, त्या कौसल्येला तिचा रामा अजुन भेटलाच नाही याबद्दल हळहळ वाटावी. मला हसावे की रडावे काही काही कळत नव्हते. पण ही रामनवमी माझ्या मनाला चटका लावून गेली ती कायमचीच…