देऊ त्यांना साथ…

शब्दांकन: अनिरुध्द शिर्के

कालच पंकज सांगत होता, “तुला माहित आहे का दरवर्षी ३ डिसेंबरला ‘जागतिक अपंग दिन’ साजरा केला जातो. २००१ च्या गणनेच्या आधारे, भारतात विविध वर्गवारीनुसार जवळपास २ करोड लोक अपंग आहेत. एका देशाच्या दृष्टीने हा आकडा मोठा आहे. २०१६ साली अपंगत्वाच्या २१ नवीन बाबी नमुद करून नवीन सुधारित कायदा अस्तित्वातही आला. परंतु देशाच्या अर्थसंकल्पात त्याला जेष्ठ नागरिकांसोबत जोडून तुटपुंजी आर्थिक तरतूद केली जाते रे.” तो पोटतिकडीने सांगत होता. मी अचंबित होऊन ऐकत होतो. त्याने सांगितलेली माहिती माझ्या डोळ्यात अंजन घालणारी होती. खरे पाहता, आपल्याकडे अपंग व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारच चिंताजनक आहे. काही ठराविक घटनांमध्ये मिळणारा कौटुंबिक आधार सोडता बाकी ठिकाणी यांना उपेक्षाच सहन करावी लागते.

आता हेच बघा ना, आपण कोणतीही वास्तु उभारताना या लोकांचा साधा विचारही करत नाही. त्यांना किती इमारतीत वैयक्तिक पातळीवर, कुणाचीही मदत न घेता सहज प्रवेश करता येतो? याचे उत्तर: बहुधा हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच असेल. असे किती खाजगी कार्यालये आहेत, जिथे यांना पात्रता असताना सहजपणे काम करू दिले जाते ? खरेदी तर माणसाच्या दैनंदिन जीवनातील एक भाग. कधी विचार केलाय कि या व्यक्ती किती दुकाने, मॉलमध्ये सहज खरेदीला जाऊ शकतात. या व अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे नैराश्य निर्माण करणारी आहेत.

त्याउलट परदेशांमध्ये त्यांना असणारा समाज आधार खुप मोठा आहे. कार्यालये, दुकाने, प्रेक्षणीय स्थळे सगळीकडे त्यांना विशेष प्रवेश देतात, त्यांच्यासाठी सोयीसुविधाही उपलब्ध असतात. आपण त्यांना समाजातील एक घटक म्हणून स्वीकारणे, त्यांचा विचार करणे व त्यांना सन्मानजनक वागणुक देणे आवश्यक आहे.

अभ्यासांती असे लक्षात आले की, बऱ्याच व्यक्तींना अपघातानेही अपंगत्व आलेले असते. एखाद्या घटनेने, आजाराने अचानक आयुष्य बदलुन जाते. अशा वेळी आपण कुणावर अवलंबुन आहोत हि कल्पनाच माणसाला असह्य होते. त्यात माणूस मनाने खचला कि अवघड होते. अश्या वेळेस त्यांना फक्त प्रेम व आधार आवश्यक असतो. मग त्यांच्यातील लढवय्या जागा होतो व लढू लागतो.

मला आठवते, मी इंजीनियरिंगला असताना, मला 2 वर्ष सिनिअर मुलगी पायाने अधु होती. बस स्टॉप ते काॅलेज साधारणतः १.५-२ किमी अंतर होते. ती रोज, स्वतःला संभाळत, रस्त्याने जाणारी अवजड वाहने चुकवत ते अंतर पार करत असे. कॉलेजच्या आवारात एका ठिकाणाहुन दुसरीकडे जाणे, जिन्यावर चढ उतार करणे किती त्रासदायक असेल याची कल्पना करणेही शक्य नाही. पण तिला कधीही तक्रार करताना पाहिले नाही. तिने जिद्दीने इंजीनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण करून दाखवले. पुढे त्या त्याच कॉलेजला प्राध्यापक झाल्या. एकाही लेक्चरला कधीही उशीरा आल्या नाहीत. आज त्या त्याच कॉलेजमध्ये विभाग प्रमुख आहेत. याचा अर्थ या व्यक्ती कष्टाळू असतात. फक्त त्यांना संधी मिळायला हवी.

परवा दुचाकीवर भाजी बाजारात गेलो होतो. एका हातात हेल्मेट, दुसऱ्या हातात पिशवी, तोंडाला मास्क, खिश्यात सॅनिटायझर, पैशाचे पाकीट, मोबाईल, गाडीची चावी. ‘एकावेळी आपण किती गोष्टी सहज सांभाळू शकतो ना’ असा विचार करत जरा मस्तीतच फिरत होतो. समोर डोक्यावर टोपी, पांढरा सदरा व पायजमा घातलेला एक भाजीविक्रेता जोरजोरात ओरडत होता. त्याच्या समोर भरपूर गर्दी होती. ‘भरपूर गर्दी म्हणजे चांगली भाजी असणार’ या विचारांना नमन करून गर्दीतून वाट काढत, त्याच्यासमोर जाऊन उभा राहिलो आणि थबकलो. तो भाजीवाला एक हाताने अधु  होता. त्याने तब्बल ८-१० प्रकारच्या भाज्या समोर छान पद्धतीने मांडून ठेवल्या होत्या. तो एकटाच होता व केवळ त्या एकाच हाताने ग्राहकांना भाजी छान पध्दतीने कागदी पिशवीत भरून देत होता, हिशेब करीत देवाणघेवाणही करत होता. त्याला पाहून मला जगप्रसिद्ध हंगेरियन नेमबाज कॅरोली आठवला, पठठयाने केवळ एकच हात असूनही ऑलंपिक सुवर्णपदकांची लयलूट केली होती. मी त्या भाजीवाल्याला आनंदाने सलाम केला. त्याला कळाले नाही परंतु त्याने खडतर परिस्थितीत हार ना मानता कसे लढत राहावे याचा पाठ घालून देताना माझी मस्तीही उतरवली होती.

गावाला माझे एक सहकारी आहेत, सैन्यात होते. सीमेवर कर्तव्य बजावत असताना जखमी झाले, डावा पाय निकामी झाला. पुढे निवृत्ती पत्करली व गावाला आले. घरची परिस्थिती नाजुक होती. शेती होती परंतु तीही कोरडवाहू. त्यांनी हार मानली नाही. जिद्दीने कामाला लागले. मजल दरमजल करत शेती नीटनेटकी केली, शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था केली, शेळीपालनाचा जोडधंदा सुरु केला. काही वर्षापुर्वी डाळिंबाची लागवड केली. नुकताच त्यांचा फोन आला होता. “साहेब, आपली डाळिंब दुबईला गेले बर का” या त्यांच्या वाक्याने नकळत सारा भूतकाळ आठवला, डोळ्यात आनंदाश्रू तरळले. “लाथ मारीन तिथे पाणी काढीन” ही म्हण विसरून “लाथ नसली तरी ध्येय गाठीलच” असे काहीसे म्हणावेसे वाटले.

समाजातही अशी प्रेरणा देणारी अनेक माणसे आहेत. सातारा जिल्ह्यातील पोलियोमुळे अपंग झालेले, एका बांगड्या विकणाऱ्या आईचे लेकरू प्राथमिक शिक्षक झाले. पुढे जिद्दीने UPSC परिक्षेत यश मिळवुन झारखंडचे कलेक्टरही झाले. रमेश घोलप त्यांचे नाव. प्रतिकुल परिस्थितीत झगडुन यश संपादन करता येते याचे ज्वलंत उदाहरण.

आपल्याला प्रत्येक क्षेत्रात अशी अनेक उदाहरणे दिसून येतील. अगदी मैदानी स्पर्धेतही अनेक दिग्गज खेळाडु आहेत. ऑलंपिक गोळाफेक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारी दिपा मलिक, बॅडमिंटन मध्ये ब्रांझ पदक मिळविणारी मानसी जोशी अथवा माऊंट एव्हरेस्ट सर करणारी अरुनिमा सिंन्हा एकापेक्षा एक सरस रत्नांची खाणच आहे.

अशी जिद्दी, कष्टाळू, ध्येयवादी माणसे आपल्याही आजूबाजूला असतील. कदाचित त्यांना, त्यांच्या प्रयत्नांना आपले मार्गदर्शन, सल्ला, मदत याची गरज असेल. या व्यक्ती स्वाभिमानी असल्याने त्या स्वतःहून आपली व्यथा मांडणार नाहीत. तेव्हा तुम्ही स्वतः प्रयत्न करा, तुमचे दोन शब्द, तुमची मदत, पाठीवर कौतुकाची थाप याचा त्यांना आधार वाटेल हे नक्की. मग तेही फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतील.

एका फुग्यावर लिहिलेले सुंदर वाक्य आठवले…”जे आपल्या बाहेर आहे ते नाही, तर जे आपल्या आतमध्ये आहे ते आपल्याला उंच घेऊन जाते.”

समाप्त.

आपला एखादा प्रयत्न, अनुभव जरूर कळवा.

अभिजीत शिर्के – एक पर्व

शब्दांकन : अनिरुद्ध शिर्के

श्री. अभिजीत सोपान शिर्के हे भारतीय वंशाचे आधुनिक शास्त्रज्ञ “Technology Man” या बिरुदावलीने प्रसिद्ध आहेत. तंत्रज्ञानाच्या महत्वपुर्ण योगदानाने देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठा बदल घडविला जाऊ शकतो यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यांनी आपल्या कार्याने युवा पिढीसमोर ‘प्रेऱणादायी व्यक्तिमत्व’ उभे केले आहे.

बालपण

अभिजीत शिर्के यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९७६ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील माध्यमिक शाळेत शिक्षक, तसेच हाडाचे शेतकरी होते. आई गृहिणी व घरीच खाजगी शिकवणी घेत असे. आमचे कुटुंब मुळचे निंबवी, श्रीगोंदा तालुका, अहमदनगर जिल्हा. वडिलांच्या नोकरी निमित्त पुणे इथे स्थायिक झाले. अभिजीत हे घरातील जेष्ठ अपत्य, त्यांच्या नंतर मी (अनिरुद्ध ) व अतुल अशी आम्ही तीन भावंडे. पुण्यात आईवडिलांचा संसार अगोदर सांगवी इथे सुरु झाला. नंतर ते खडकी इथे आले. माईणकरांचा वाडा व त्यात विविध धर्मीय शेजारी असलेले आम्ही भाडेकरू. भारतातील जवळपास सर्वच जातीधर्म, त्यांचे सण, विधी, संस्कार त्या वाड्यात आम्हाला नकळत समजत गेले.

पुढे आईवडिलांनी मोठे धाडस करून मांगल्य सोसायटीमध्ये दोन बीएचके फ्लॅट घेतला. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी मोठी गोष्ट होती. आम्हा तीनही भावंडांचे शालेय शिक्षण आलेगावकर हायस्कुल येथे झाले. दादा लहानपणापासुन चुणचुणीत मुलगा. वक्तृत्व स्पर्धा, नाट्य स्पर्धा यात त्यांचा सहभाग ठरलेलाच. आज कोणाही लहानथोरांशी कुठल्याही विषयावर अचूकपणे बोलून आपला मुद्दा मांडण्याचे त्यांच्या कौशल्याची मुहूर्तपेढ बहुधा त्याच काळात रचली गेली होती.

वडिलांचा शेतीचा व्यासंग, त्यामुळे शनिवार, रविवार ते गावाला जायचेच. जमेल तेव्हा त्यांच्यासोबत दादांची स्वारी निघायची. उन्हाळी व दिवाळी सुट्टी तर गावाला ठरलेलीच. बहुधा यामुळेच शेतीविषयी गोडी निर्माण झाली असेल. दादांनी तर वयाच्या १५व्या वर्षी शेतीतील सर्व ज्ञान आत्मसात केले होते. दादा अगदी कोवळ्या वयात, शेतात पिकवलेला भाजीपाला घेऊन भल्या पहाटे अहमदनगर बाजारात जात. दादांनी शेतमाल विकतानाही उत्कृष्ट दर्जाचा शेतमाल, योग्य प्रतवारी, आकर्षक पॅकिंग हे गुणसूत्र अवलंबविले होते. विसापुरला भरणाऱ्या रविवारच्या आठवडे बाजारात तर ग्राहक आमच्या मालाची वाट पाहत थांबत. आम्हाला बैलगाडीतुन भाजी घेऊन भर उन्हात जावे लागत असे. ग्राहक, बाजार, विक्री कौशल्य याचे बाळकडू दादा स्वतः शिकत व आम्हालाही शिकवत.


कुटुंब

आमचे वडील, सोपानराव शिर्के नावाप्रमाणेच संत व्यक्ती. नोकरी, शेतीची आवड सांभाळुन सगळ्यांच्या अडीनडीला धावून जाणारा देवदूतच. कष्टाळु वृत्ती, प्रामाणिकपणा, स्पष्टवक्तेपणा हे वडिलांचे गुण दादांनी अचुक हेरले आहेत. दादांच्या प्रत्येक कार्याचे त्यांना प्रचंड कौतुक. ते नेहमीच दादांच्या सोबत खंदे समर्थक म्हणुन उभे ठाकले. वडिलांच्या आजारपणात दादांनी वडिलांची केलेली सेवा एका आदर्श मुलाचे उदाहरण आहे. दुदैवाने १७ मार्च २०२० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. तो दादांसाठी खुप मोठा धक्का होता. त्यातुन त्यांना सावरण्यासाठी बराच काळ जावा लागला.

आमची आई मंगल शिर्के, अतिशय हुशार, प्रचंड मेहनती, संयमी. समोर आलेल्या बिकट परिस्तिथीने खचुन न जाता, त्याला सामोरे जाऊन कुठल्याही संकटाचा धीरोदात्तपणे सामना करणारी व्यक्ती. आईचा हाच गुण दादांच्या ठायी दिसतो. इतर कुठल्याही दागिण्यांपेक्षा माझी मुलेच माझी अनमोल दागिणे आहेत, हे आई निक्षुन सांगायची. आईच्या विचारांचे, वर्तवणुकीचे पडसात पुढील पिढीवर नक्कीच पडतात. आम्हां भावंडांमधील मोजक्या उत्तम गुणांच्या संस्काराचे श्रेय आईलाच जाते.

आमच्या मातोश्रींचे वडील कै. सुदामराव भांगे, प्राथमिक शिक्षक सोबत उत्कृष्ठ लेखक. दादांनी त्यांचे वाचन, लिखाण, संभाषणकला, कथाकथन हे गुण अचूकपणे घोटवले.

आमचे आजोबा (वडिलांचे वडील) कै. नारायणराव शिर्के म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, ते ब्रिटिशकालीन फौजेत होते. अभिजित दादांची व अण्णांची (आजोबा) खास मैत्री. नारळाच्या झावळ्यांपासून खराटे बनवणे, शिलाई मशीन चालवणे, बियाणे तयार करणे, झाडांवर कलमे करणे शिवाय त्याकाळी प्रचलित असणारी शेती औजारासाठी लागणारे लाकडी फाळ व इतर साहित्य बनविण्यात अण्णांचा हातखंडा. दादांनी या सर्व गोष्टी बारकाईने पाहिल्या, शिकल्या, आत्मसात केल्या. अभिजीत शिर्के या व्यक्तिमत्वाचे सूक्ष्म निरीक्षण व कोणतेही तंत्रज्ञान आत्मसात करण्याची कला याची मुहूर्तपेढ रोवण्याचा तो काळ होता.

या सर्व प्रवासात दादांना पत्नीची भक्कम साथ आहे. त्यांच्या दोन्ही चुणचूणीत मुली वडिलांपासुन सतत शिकत असतात.


कारकीर्द सुरुवात

मशरूम

सतत प्रयोग करीत राहणे हा दादांचा अजून एक व्यासंग आहे. अगदी लहानपणापासुन त्यांनी हा व्यासंग जपला आहे. शेती असो वा महाविद्यालय अथवा व्यवसाय, ते सतत काही तरी नाविन्यपुर्ण प्रयोग करीत असतात. विज्ञान प्रदर्शनांतुन सहभाग नोंदवणे हे त्यांनी कायम जपले. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात “मशरूम तंत्रज्ञान” यावर संशोधन करून जिल्हा व राज्य स्तरावर पारितोषिके पटकाविले आहेत.

पदवी नंतर त्यांनी मार्केटिंग क्षेत्रात काम मिळविण्याचा प्रयत्न केला. घरोघरी जाऊन पुस्तके, वह्या, चमचे, खेळणी विकण्यासाठी ते धडपडू लागले. नुकतेच पदवीधर झालेल्या व्यक्तीस हा फार कठीण काळ असतो. तुमचे ज्ञान, संस्कार, संयम, जिद्द साऱ्यांचीच कसोटी लागते. बऱ्यापैकी पैसे मिळत होते परंतु दादांचे काही मन रमेना.

त्यांनी “National Research Center for Mushroom, Solan” इथे “मशरूम उत्पादन” विषयात प्राविण्य मिळविले. ‘मशरूम उत्पादन हा एक प्रमुख व्यवसाय होऊ शकतो’, हा तरूणांकरिता संदेश घेऊन देशभर प्रशिक्षण शिबिरे घेतली व एक मार्गदर्शक म्हणून ते उदयास आले. स्वतःच्या शेतात मशरूम फार्म बनविला. स्वतःच उत्तम दर्जाचे मशरूम बियाणे उत्पादन व विक्री चालू केली. आमच्या आई वडिलांनी त्यांना भक्कम साथ दिली. पुढे मशरूमवर प्रक्रिया करून उत्पादने बनविण्यास चालू केले.

व्यवसायात त्यांनी स्वतःला झोकून दिले. संशोधनवृत्ती कायम ठेऊन नवनवीन उत्पादने विकसित केली. भरपूर काम, लेख, चर्चासत्रे, व्याख्याने हा दिनक्रम होऊन बसला. माजी केंद्रीय मंत्री कै. मोहन धारिया यांनी त्यांचे कौशल्य हेरले. ‘वनराई’ संस्थेच्या माध्यमातुन सामाजिक रोजगार निर्मिती हि एक चळवळ बनली. यातून ‘अळिंबीची लागवड‘ या पुस्तकाचा जन्म झाला. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्सझांडर यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित झाले. पाठोपाठ व्हिडिओ कॅसेट व सीडी हि प्रकाशित झाल्या.


बायोकेयरची सुरुवात

कोणतेही उत्पादन विकताना मार्केटिंग फार महत्वाचे असते. श्री. विजय गाढवे यांच्या सोबत “बायोकेयर” नावाने नवीन कंपनी सुरू केली. प्रसिद्ध डॉ. कल्याण गंगवाल, डॉ. पराग संचेती, डॉ. के व्ही शाह यांच्या उपस्तिथीत बायोकेयरचे रोपटे लावण्यात आले.

एनर्जी क्षेत्र

शेतीतील आवड सतत नवीन काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करत होती. पारंपरिक शेती परवडत नाही हे लक्षात येऊ लागले. पेट्रोल, डीझेलचे दर वाढतात मग शेतमालाचे का नाही हा प्रश्न दादांच्या मनात थैमान घालू लागला. मी हि त्यांना साथ द्यायची ठरविले. नोकरी सोडून त्यांच्या सोबत व्यवसाय करू लागलो. पेट्रोल, डिझेलचे उत्पादन घेता येईल अशी पिके घ्यायचे निश्चित केले.

जेट्रोफा वनस्पतीची लागवड मोहीम सुरु केली. सामुहिक शेती सदराखाली बँक ऑफ महाराष्ट्र सोबत ३०० कोटी रुपयांचा करार केला. संपुर्ण भारतात जेट्रोफा-बायोडिझेल इंधन निर्मिती या क्षेत्राबद्दल प्रचार व प्रसार झाला. देशातील सर्वात मोठी नर्सरी पुण्यात निर्माण केली गेली. जेट्रोफाची लागवड हे मिशन मोठया प्रमाणात राबविले गेले. टिश्यू कल्चरच्या सहाय्याने हायब्रीड जाती तयार करण्यात आल्या. सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, नायजेरिया, केनिया, टांझानिया आदी देशातील व्यावसायिक व देश प्रतिनिधी यांच्यासोबत भेटीगाठी, चर्चासत्रे व प्रायोगिक पथदर्शी प्रकल्प यांची निर्मिती केली. सर्वोत्तम शास्त्रज्ञ म्हणुन अनेक राष्ट्रप्रमुखांपर्यंत “अभिजीत शिर्के” हे नाव पोहचले. २००८ मध्ये इंडोनेशिया मधील बाली इथे झालेल्या “Jatropha world Summit” चे अध्यक्ष स्थान अभिजीत शिर्के यांनी भूषविले.

याचदरम्यान बायोडिझेल निर्मितीचा प्रकल्प हि सुरु केला. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिवहनच्या बसेसमध्ये बायोडिझेलच्या वापराने वाहनातील प्रदूषण घटवू शकतो हे सिद्ध केले. या प्रयत्नांची दखल CIRT (केंद्र सरकार) यांनी घेतली. पुढील काळात “बायोडीझेलचा वाहनात वापर” आदी विषयांवर सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनेक व्याख्याने CIRT ने आयोजित केली. “वनस्पतीतेलाचा बायोडीझेलसाठी वापर” सारख्या विषयावरील समितीवर काम करण्याची संधी दिली. अभिजीत शिर्के हे उत्तम व्याख्याते आहेत असा अधिकाऱ्यांचा सूर बरेच काही सांगून जातो.


अध्यात्म

घरात लहानपणापासुन आईची शिकवण व संस्कार पाठीशी होते. अध्यात्माची गोडी त्यांना घरीच लागली. कीर्तन, भजन, कथा ऐकणे व सांगणे या दादांच्या आवडत्या गोष्टी. वेळ मिळाला कि तीर्थस्थानी जाणे, हे दादांचे ठरलेलेच.

मंदिर असो व चर्च, गुरुद्वारा, विहार, दर्गा दादा सर्व ठिकाणी भेट देतात. प्रत्येक धर्माचे ज्ञान समजुन घेण्याचा प्रयत्न करतात. “वसुधैव कुटुम्बकम” या उक्तीला अनुसरून, आपण सर्व धर्माचे लोक एकाच कुटंबाचे घटक आहोत. हाच त्यांचा कायम संदेश असतो. जात, धर्म, पंथ, वर्ण असा कधीही भेदभाव त्यांनी केला नाही. समाजातील सर्वच स्तरातील लोकांच्या बाबतीत सर्वधर्मसमभाव हा एकाच मूलमंत्र ते कायम जपतात.

अनेक वर्षांपासुन आठवड्यातील एक दिवस ते प्रार्थना दिवस म्हणुन पाळतात. सामाजिक कार्यात सर्वधर्मीय लोकांना आवर्जुन सहभागी करून घेतात. धर्मांमधील द्वेष, भांडणे त्यांना अजिबात मान्य नाही. आपण सर्व ईश्वराची मुले आहोत. योग्य मूल्यांचा अंगीकार करून जगात शांतता राखा हीच शिकवण ते समाजाला देत असतात.

सर्व धर्मियांना एकत्र घेऊन सर्व धर्मांची जगातील मोठी प्रार्थना मंदिरे उभी करायची, हे त्यांचे ध्येय आहे. मानवता हा एकच धर्म आहे हे जगाला पटवून देणे हे आदयकर्तव्य समजून ते प्रयत्न करीत आहेत.


कामाचा विस्तार

काम पुढे वाढवत असताना त्यांच्या मनात एक विचार आला. अजून कुठले असे पीक शोधावे कि ज्यापासून इंधन निर्मिती करता येईल. “शोधले कि सापडते” या उक्तीला अनुसरून बायोमासचा पर्याय सापडला. मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारा कच्चा माल. ठरले तर, बायोमासपासून तेल निर्मितीचे ध्येय डोळ्यसमोर ठेवले. आधी ५ली प्रती तास उत्पादन देणारी छोटी मशीन बनविली. परंतु या संशोधनावर अनेक प्रश्न उभे राहिले. मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य आहे का ? जागतिक व्यवसायिक स्तरावर याचे उत्पादन घेता येईल का ? पुन्हा दादांचा संशोधक जागा झाला. त्यांनी थेट नेदरलँड गाठले.

युरोपियन मानांकने (EU Standard) असणारे मशीन बनवायचे ठरले. श्री. रॉब यांनासोबत घेऊन, २०१५ साली शेतीच्या टाकाऊ मालापासून तेल निर्मिती करणारा जगातील पहिला मोबाईल प्लांट बनवला. १० फेब्रुवारी २०१५ ला डच पार्लमेंटमध्ये या संशोधनाबद्दल गौरवोउद्गार काढण्यात आले. कौतुकाची थाप पाठीवर पडली होती, दादांच्या साहसी मनाला उभारी देणारा प्रसंग होता तो.

जगाभरातून कौतुक झाले. अनेक राष्ट्र हे तंत्र मिळावे म्हणुन संपर्क करू लागले. व्यावसायिक ऑफर देऊ लागले. पण अभिजीत शिर्के यांच्यासमोर देशातील बेरोजगार तरुण, शेतकरी व देश दिसत होता.

दादांनी आपण हे तंत्रज्ञान आपल्या देशातच ठेवू असे निक्षुन सांगितले. देशातील इंधन आयात थांबावी व रोजगार निर्मिती व्हावी ही त्यांची प्रबळ इच्छा आहे. शेतीच्या टाकाऊ मालापासून तयार केलेल्या तेलावर पुढील प्रक्रिया करणे आवश्यक होती. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड यांसोबत संशोधन करार करून हरीत डिझेलची निर्मिती करण्यात आली. तसेच या तेलापासून हरीत प्लास्टिक, पॉलिमर, मोनोमर, रबर या पदार्थांचीही निर्मिती करण्यात आली. पेट्रोल, डिझेल, गॅस, केमिकल अशा विविध शाखा विकसित होत आहेत. शेकडो उत्पादने बनविण्याची समीकरणे तयार आहेत.


सन्मान

२४ मे २०१८ रोजी नेदरलँडचे मा.पंतप्रधान मार्क रूट, मा. उपपंतप्रधान कॅरोला स्काउटण व त्यांचे शिष्टमंडळ भारतात आले होते. त्यांच्या उपस्तिथीत श्री. अभिजीत शिर्के बी श्री. रॉब यांच्या प्रकल्प सहकार्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

अनेक देश त्यांच्या देशांचा GDP बदलण्यासाठी त्यांना आमंत्रित करू लागले आहेत. “Technology Man” हि ओळख जगासमोर येऊ लागली आहे.

गणपती बाप्पा मोरया ..

(गुप्तहेर दुनियेची एक सफर)
शब्दांकन : अनिरुद्ध शिर्के

दुपारचे दोन वाजले होते. गणपतीची प्रतिष्ठापणा, आरती, नंतर जेवण होऊन सचिन बसलाच होता की, फोन वाजला. पलिकडुन आवाज आला ” हॉटेल गुडलक कॅफे, ५ नंबर टेबल, संध्याकाळी ४ वाजता”. फोन कट झाला. सकाळपासुन सचिन या फोनची वाट पाहत होता. २५ जानेवारीला संध्याकाळी सहाच्या सुमारास चांदणी चौकात चार जणांची निर्घृण हत्या झाली होती. तब्बल ७ महिने झाले तरी पोलीसांना मारेकरी अथवा खुनाचे कारण सापडले नव्हते. पोलीसांवर दबाव वाढला होता. दिघे साहेब, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा यांनी सचिनला बोलावून काही धागेदोरे हाती लागतात का हे पाहण्यास सांगतले होते.

सचिनचा व सरांचा तसा जुना परिचय होता. सरांनी अनेकवेळा सचिनला मदत केली होती. सचिनही त्यांना लागेल ती मदत करायचा. या केसचा काहीच निकाल लागत नाही म्हटल्यावर सरांनी चाकोरीबाहेर जाऊन सचिनची मदत घ्यायचे ठरवले होते. सचिन कामाला लागला. त्याने बावधन पोलीस स्टेशनला केस बद्दल काही माहिती मिळते का ते बघितले. खुनाच्या जागेवर जाऊन आला, घटनास्थळाचे फोटो बघितले. पण फारसे काही हाती लागले नाही. मयत व्यक्ती कोण होत्या याबद्दल देखील काहीच उपयुक्त माहिती नव्हती.

परवाच, परत एकदा फाईल बघताना त्याच्या लक्षात आले. पोस्टमार्टम अहवालामध्ये मयत व्यक्तीने मृत्युपुर्वी चहा सारखे पेय पिले असण्याची शक्यता वर्तवली होती. त्याने तडक दिपकला फोन केला. दिपक म्हणजे एकदम खवय्या. त्यात कोथरूड, बावधन परिसराची त्याला खडानखडा माहिती. दिपकने जवळपासच्या २,३ चहाच्या ठिकाणांची नावे सांगितली. सचिन तिथे पोहोचला. जवळपास सगळीच दुकाने मुख्य रस्त्याला होती. तिथे त्याने चौकशी केली. पण दिपकने सांगितलेली नंदूची टपरी बंद होती. नंदु कुठे गेला कोणालाच माहिती नव्हते. त्याने आपले खबऱ्यांचे नेटवर्क जागे केले. आता मोहीम होती नंदूचा शोध. त्यासंदर्भातच त्याच्या खबऱ्याचा फोन आला होता.

सचिन अधिकचा विचार न करता आवरून निघाला. गुडलकच्या बाहेर गाडी लावली, आत जाऊन बसला. बन मस्का, स्पेशल चहाची ऑर्डर दिली व खबऱ्याची वाट पाहू लागला. खबरी आला, परंतु काही न बोलता कोपऱ्यावरच्या टेबलावर जाऊन बसला. त्याने इशाऱ्यानेच ५ नंबर टेबलकडे बोट दाखवले व तो तडक बाहेर पडला. त्या ५ नंबर टेबलवर बारीक अंगकाठीचा, वाढलेली दाढी व अंगात फुलांच्या नक्षीचा निळा शर्ट घातलेला एक इसम, दोन्ही पाय एकमेकांवर दुमडुन, अंंग चोरून बसला होता. तो घाबरलेला दिसत होता. सचिन त्याच्यासमोर जाऊन बसणारच होता, परंतु त्याची शोधक नजर पाहून थांबला.

बराच वेळ झाला. त्याची भिरभिरणारी नजर दरवाजाच्या दिशेने वळली. डोळ्यांवर चष्मा, अंगात काळे जाकेट, काळी पँट घातलेला एक माणूस त्याच्या टेबलजवळ आला. दोघे काहीतरी कुजबुजले. त्या चष्म्यावाल्याने आपल्या जवळची पिशवी पुढे सरकवली. त्या निळ्या शर्ट वाल्याने ती स्वतःकडे घेतली. तो चष्मा घातलेला माणूस तडक बाहेर पडला. निळा शर्ट वाला उठणारच होता की, सचिन त्याच्यासमोर जाऊन उभा राहिला. ” नंदु वर्पेला ओळखतोस का?” सचिनचा प्रश्न.

ते नाव ऐकताच, तो चमकला. “काय झालं ? काय काम आहे ? माझं नाव कसे माहिती? ” असे त्या निळ्या शर्ट घातलेल्या माणसाने विचारले. “म्हणजे तुच नंदु वर्पे आहेस तर. मला सांग, २५ जानेवारीला तुझे दुकान चालु होते का?” सचिनने थेट मुदयालाच हात घातला व त्याच्या समोर बसला. लागोपाठ प्रश्नांची सरबत्ती सुरु झाल्यावर नंदु काय ते समजला. तो चांगलाच घाबरला होता. त्याने आजुबाजुला पाहिले व अचानक शेजारून जाणाऱ्या वेटरला सचिनच्या अंगावर धक्का देऊन, तो दरवाजाच्या दिशेनं पळाला. सचिनही मागे पळाला.

नंदु पिशवी बगलेत धरून, रस्त्यावरून वेडावाकडा पळायला लागला. चौकातुन फर्ग्युसनच्या दिशेने सुसाट सुटला. सचिनही त्याच्यामागे पळत होता. नंदुचा त्या प्रकरणाशी नक्कीच काहीतरी संबंध असणार, अशी त्याची खात्री पटली. आशेचा किरण समोर दिसत होता. नंदुचे पकडले जाणे व त्याच्याकडुन माहिती मिळणे जास्त महत्वाचे होते. दोघांचे पळणे चालुच होते. नंदु रस्त्याच्या डावीकडून वैशाली हॉटेलच्या दिशेने रस्त्यावर आला. सचिनने वेग वाढवला. एवढ्यात एक वेगवान गाडी आली व तिची नंदुला धडक बसली. नंदु रस्त्याच्या उजवीकडे फेकला गेला. गाडी नंदुजवळ जाऊन थांबली, माणसे जमा होऊ लागली. सचिन रस्ता पार करून तिकडे पोहोचणारच होता की, ती गाडी निघुन गेली. गर्दीला बाजु करून सचिन नंदुजवळ पोहोचला.

नंदु रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. जोरदार धडक बसल्याने त्याचा जागेवरच मृत्यु झाला होता. सचिनचे डोके सुन्न झाले. हातात आलेली संधी हुकली होती. त्याने नंदुकडे होती, ती पिशवी शोधण्याचा प्रयत्न केला. आजुबाजुला पाहिले, परंतु ती पिशवी नव्हती. गर्दीतील कोणी उचलली असेल का? ती गाडी थांबली, त्या माणसांनी तर नेली नसेल ना? पण कोणाला विचारावे तर प्रकरण अंगाशी आले असते. एव्हाना गर्दीतील कोणीतरी पोलिसांना फोन लावला. आता अधिक वेळ न थांबता निघणे योग्य राहील असे सचिनला वाटले. तो हताशपणे घरी निघाला.

आज सचिनच्या घरी गौरीच्या उद्यापनाची तयारी चालु होती. नैवेद्य तयार होत होता. दिघे साहेबांचा फोन येऊन गेला होता. साहेबांनी ‘तुझे काम चालू ठेव’ असे सांगितले होते. तितक्यात सचिनचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. त्याने फोन उचलला. पलिकडुन आवाज आला. ” सचिन साहेब, चांदणी चौक बाबतीत, तुमच्यासाठी एक खास खबर आहे. संध्याकाळी ५ वाजता डेक्कन बस स्टॉपला भेटा.” सचिन विचारात पडला. त्याच्या नेहमीच्या खबऱ्यांपैकी कोणाचाही आवाज नव्हता. इतक्या अचूकपणे माहिती सांगणारा कोण असेल? त्याला माझे नाव, नंबर कसा माहित? अनेक प्रश्न मनात निर्माण झाले होते.

गौरीपुजन, जेवण उरकल्यावर तो बाहेर पडला. ठीक पाच वाजता तो डेक्कन बस स्टॉपवर हजर होता. तितक्यात त्याचा फोन वाजला. ‘डावीकडे येवले अमृततुल्यला या. दोन चहा सांगा’. सचिन तडक दुकानात शिरला. नेहमीप्रमाणे दुकानात गर्दी होती. दोन चहाची ऑर्डर दिली. दोन कप समोर आले. त्याने एक उचलला. तेवढ्यात एक जण मागुन आला व त्याने दुसरा उचलला. सचिनने मान वळवली तर ‘बाहेर या’ असे तो म्हणाला. अंगावर कुडता, निळी जीन्स, पायात शुज, पिळदार मिशी, डोक्यावर वाढलेले केस अश्या पेहरावातील, साधारणतः पन्नाशीतील एक जण पुढे जाऊन बाजुला थांबला. सचिन शेजारी जाऊन उभा राहिला.

“तुम्हाला काय वाटते नंदु कसा गेला ?” त्याने विचारले. सचिनही भांबावून गेला. “नेमके काय म्हणायचंय?” सचिनचा प्रतिप्रश्न. “नंदुला उडवला. तुम्हाला त्याची बॅग नाहीच सापडली ना. कशी सापडणार म्हणा ? ज्यांनी दिली त्यांनीच नेली.” सचिनला झटकण डोळ्यासमोर सगळे आठवले. या माणसाकडे एवढी माहिती कशी काय? हा प्रश्न मनात आला. त्याने न राहवून विचारलेच. ” तुम्हाला या प्रकरणाची बरीच माहिती आहे असे वाटते. आपली ओळख?”.

“ते सोडा. जे घडलय, ते चांगल्यासाठी घडलय. तुम्ही तो नाद सोडा. तुम्ही एक चांगला माणुस म्हणुन सांगितलं.” तो माणूस चहाचा घोट घेत म्हणाला. सचिनचे समाधान झाले नाही. “हे पहा. मी केस हातात घेतली की, त्याचा सोक्षमोक्ष लावतोच. समाजात सर्रास असे गुन्हे घडायला लागले तर अंदाधुंदी माजेल. आपण काय नुसते गप्प बसायचे?… मी काही शांत बसणार नाही. गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी. पोलीस प्रशासन आपले काम करेल. पण आपलेही काही कर्तव्य आहे ना. मी तुमच्या धमक्यांना भिक घालणार नाही”. सचिनचा पारा वाढला होता.

हा हा .. तो माणूस हसला. “पोलीस… अहो साहेब, सगळे पोलीस नीट वागले असते तर देश कधीच सुधारला असता. हं आता, दिघे साहेबांसारखे असतात काही चांगले ऑफिसर. पण त्यांनाच लोक त्रास देतात. आता तुम्हीच बघा, या केसला किती महिने झाले? सात.. काही सापडलं.. नाही… तुमच्या दिघे साहेबाला किती टेंशन आलंय. आता त्यांनी तुमची मदत घेतली. कुठतरी साहेबालाही माहिती आहेच की, कस आहे ते …तुमचं … पोलीस प्रशासन…” तो उपहासात्मक बोलला. सचिनला काही ते आवडले नाही. त्यात दिघे साहेबांचा विषय निघाला त्यामुळे तो शांत होता.


तो आता शांततेतच बोलला. “खरेतर, मला तुझी कीव वाटते. एवढी माहिती असुनही गुन्हेगारांना अजुन पकडुन दिले नाहीस. तुच तर त्यांना सामील नाहिस ना.” सचिनच्या आवाजातली वाढलेली धार, हे त्या माणसाने लगेच ओळखले. चहाचा कप बाजुला ठेवत तो म्हणाला, “तुम्ही एक काम करा. इक्बाल मामु कोण आहे ते शोधा. तुम्हाला सगळा उलगडा होईल.”


“इकबाल कोण इकबाल..त्याचा काही ठावठिकाणा? ..कसा दिसतो?…काय करतो? कुठे भेटेल?…काहीतरी सांग.” सचिनने झटकण प्रश्न टाकले. “साहेब, इकबाल एक टायरवाला आहे. म्हणजे पंक्चरचा धंदा नावापुरता..बाकी. .. बाकी तुम्ही हुशार आहात. काळजी घ्या.” तो माणूस एवढे बोलून निघाला व गर्दीत गायब झाला.


सचिन पुर्ण विचारात पडला. अगोदर नंदु, आता इकबाल…नेमका काय प्रकार आहे? आणि या टायरवाल्याला कसे शोधणार? लगेच त्याला आठवला, त्याचा खास मित्र तबरेज भाई. व्यवसायिक, मोठा जनसंपर्क असणारा, यारों का यार, एकदम देशभक्त माणूस. त्याने लगेच फोन लावला. प्रसंगाचे गांभीर्य समजावून सांगितले. “भाई, तु घाबरू नको. थोडा वेळ दे. काम हो जाएगा”. तबरेजचे ते शब्द ऐकून सचिनला धीर आला. तबरेज शब्दाचा पक्का माणूस. त्यामुळे तो निर्धास्त झाला होता.


सकाळी दहा वाजता सचिनचा फोन वाजला, तबरेजचा होता. “हॅलो, भाई ये तो अलगही किस्सा है ! हा बंगाली म्हणुन सांगतो पण मुळ बांगलादेशी आहे. दोन वर्षांपूर्वी कोथरुडला आलाय. टायरचे दुकान आहे. गावावरून कामाला पोर घेऊन येतो. वैसे तो, सबसे एकदम अच्छा बातचीत करता है । लेकीन मुझे कुछ ठीक नही लग रहा है । फॅमिलीत कोणी नाही. आता एक मोठा फ्लॅट पण घेतला आहे. जर कोणी नाहीतर मोठा फ्लॅट कशाला घ्यायचा? ” तबरेजने योग्य मुद्दा मांडला होता आणि माहिती तर भन्नाट काढली होती. सचिनला आकाश ठेंगणे झाले होते. त्या दिवशी गुडलक मध्ये इकबालच होता का? याच्या टीमनेच तर त्या चार माणसांना मारले नसेल ना? हे विचार मनात चालू होते तोच “भाई, उसका क्या करने का ?” तबरेजच्या प्रश्नाने तो भानावर आला.


“कुछ नही, मी सांगतो तुला. मला जरा वेळ दे. त्याचा पत्ता पाठवुन दे आणि थँक्स हा भाई. तु एवढी माहिती काढलीस.” सचिन चेहऱ्यावर स्मितहास्य आणत म्हणाला. “बस क्या भाई !! तु असे नको बोलुस. मित्रांसाठी आपुण कधीपण रेडी आहे. फक्त तु एकटा नको जाऊ. प्रॉब्लेम होऊ शकतो. काळजी घे. आणि हो, ते तेवढे मोदक पाठवुन दे.” तबरेज हसत म्हणाला. “नक्की रे ” म्हणत सचिनही मनापासून हसला. तबरेजच्या माहितीने वेगळीच उकल झाली होती परंतु अजूनही ठोस माहिती हाती लागली नव्हती. दिघे सरांना सांगु की नको हा विचार मनात येत होता. पण तबरेजने सांगितल्याप्रमाणे एकटे न जाता काळजी घेणेही आवश्यक होते. खुप विचार केल्यावर त्याला कांहीतरी आठवले. चटकन त्याने फोन हातात घेतला.


“हॅलो, बोल ना मित्रा” पलिकडून आवाज आला. तो सचिनचा पोलीस अधिकारी मित्र विशालचा आवाज होता. सचिनने काय हवे ते सांगितले. विशालने तत्काळ होकार दिला. आणखी एक मित्र युवराजला बोलव असेही सांगितले. विशाल त्याचा अजुन एक सहकारी सोबत घेणार होता. सचिनने एकटे न जाता टीम बनवुन इकबालला गाठायचे ठरले.


वेळ सकाळी ११. इकबालच्या दुकानासमोर सचिन पोहोचला. दुकानात ८-१० टायर पडलेले होते. हवा भरायचा कॉम्प्रेसर, पंक्चर काढायचे साहित्य, हवा भरायचा पिवळा पाईप असा पसारा पडला होता. दुकानात तीन कारागिर होते. त्यांच्या दिसण्यावरूनच ते बांगलादेशी वाटत होते. दुकानातच गडद निळया रंगाचा, भरपुर मळालेला शर्ट, निळी पँट व डोक्यावर जाळीदार टोपी घालून एक जण एका लाकडी काउंटरवर टायरला पॅच लावण्याची तयारी करत होता. त्याच्या वागण्यावरून तोच इकबाल असावा हा अंदाज आला. एव्हाना विशाल, त्याचा सहकारी हे ही तिथे बनावट ग्राहक बनुन पोहोचले. युवराज दुकानाच्या पलिकडे चहा टपरीच्या बाकड्यावर बसला होता. “टायर में हवा भरणा है” सचिनने आवाज दिला. त्या मुलांपैकी एकाने तोंडात माव्याचा बकाणा असल्याने हातवारे करून दोन मिनिटे थांबायला सांगितले. तोपर्यंत सचिन इकबाल शेजारील खुर्चीवर जाऊन बसला.


“आज बहुत भीड है ? क्या बात है?” सचिनने सुरवात केली. “हा, असते ना या वक्ताला. ” त्याचे मराठी शब्द ऐकून सचिन चमकला. “अरे वा!! तुम्हाला छान मराठी येते की” सचिनने असे बोलताच तो म्हणाला “पुण्यातच जन्मुन मोठा झालो भाऊ. मराठी येणारच ना.” तबरेजने दिलेली माहिती व याचे सांगणे यात विरोधाभास होता. “तुम्ही कोणत्या शाळेत होता?” सचिनने पटकन प्रश्न विचारला. तसा तो व त्याचे कारागिर चमकले. सचिन, विशाल दोघांनाही ते जाणवले. पक्क्या पुणेरी प्रश्नाने ते घडले होते. “येच अपना, गाव मधील म्युनिसिपल शाळा…. ये अब्दुल, इनका काम जल्दी निपटा दे.” त्याने विषयाला बगल दिली होती.

सचिन ताडकन उठून उभा राहिला व त्याच्याजवळ जाऊन म्हणाला “कोणती म्युनिसिपल शाळा, इकबाल? पुण्यातली की बांगलादेशची?” इकबाल डोक्यात वीज चमकावी असे स्तब्ध झाला. परत भानावर येत “काय बोलताय? कोण हाय तुम्ही? ये बांगलादेशी कोण बोला? और तुमको, मेरा नाम कैसे मालुम?” तो मागे सरकला. “अरे इकबाल, माझ्याकडे तुझा सगळा कच्चा चिठठा आहे. तु पुण्यात कधी आलास? सारखे नवनवीन बांगलादेशी पोर आणतोस. नंतर ते कसे,कुठे गायब होतात. दुकान, फ्लॅट खरेदी सगळी माहिती आहे. अगदी …चांदणी चौकात काय झाले ते ही” सचिनने सगळा इतिहास, वर्तमान एका मिनिटात मांडला. ते ऐकताच इकबाल हात खिशात घालणार, तोच विशालने त्याला जोरात लाथ घालून खाली पाडले. विशालच्या मित्राने पटकन एका कामगाराला ताब्यात घेतले. इकबालचे इतर दोन कामगार पळुन जाणार तोच, युवराजने त्यांना एका फटक्यात जमिनीवर लोळवले व मानगुटीला धरून दुकानात घेऊन आला.


“बोलतोस आता की, करू मोकळी.. ” विशालने त्याच्या कानशिलावर बंदुक ठेवत विचारले. काही वेळ पोलीस खाकया दाखवल्यावर इकबालने सांगितलेले अजब होते.


इकबाल मुळचा बांगलादेशी होता. त्याला अनधिकृतरित्या भारतात आणले गेले होते. त्याला दिलेले काम तो करत असे. बांगलादेशातुन मुले त्याच्याकडे पाठवली जात. कुठुन तरी भरपुर पैसेही येत. त्याने त्या मुलांना पंक्चरचे काम शिकवायचे आणि फोन येईल तेव्हा तिकडे त्यांना पाठवायचे. ती मुले पुढे काय करतात? ते त्याला माहित नव्हते. चांदणी चौकात मारले गेलेले ते चौघे, इकबालकडेच कामाला होते. नंदुच्या खोलीवर त्यांना रहायला मिळाले होते. नंदुला दारूची सवय होती, त्यामुळे त्याची त्या चौघांशी मैत्री झाली. त्या हत्याकांडाच्या दोन दिवस अगोदर त्यांना दोन बॅग देण्यात आल्या होत्या. त्यात भरपुर दारूगोळा, स्फोटके होती. २६ जानेवारीला धमाका करण्याचा त्यांचा डाव होता. नंदुने ती बॅग पाहिली व तो घाबरला.

तो रात्रीच, कोणालाही काही न बोलता गावाला निघून गेला होता. त्यामुळेच त्याचे दुकान बंद होते. त्यांना सात महिन्यानंतर नंदुचा पत्ता लागला होता. नंदुच्या हत्येच्या अगोदर त्याला खुप पैसे देतो असे सांगुन, गावावरून इकडे बोलविण्यात आले होते. नंदुला गरज होतीच, म्हणुन तो आला होता. त्या दिवशी गुडलकच्या बाहेर त्यांची माणसे होतीच. नंदुला सगळे माहिती आहे व तो सापडला जाईल, असे वाटल्याने त्यांनीच नंदुला उडविले होते. पैशाची बॅगही परत घेऊन पळुन गेले होते. त्यांच्या मार्गातील काटा दुर झाला होता.

एवढे सगळे ऐकल्यावर सचिनला एक एक उकल होऊ लागली. ते अनधिकृत बांगलादेशी होते म्हणुन पोलीस फाईलला त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. वाईट संगतीने नंदुचा हकनाक बळी गेला होता. पण मग, त्या चौघांना कोणी मारले? हे गुढच होते. सचिन पुन्हा चिंतेत पडला. दिघे सरांच्या आदेशाप्रमाणे पुढील चौकशीसाठी इकबाल व टीमला गुन्हे शाखेकडे सुपूर्त करण्यात आले. युवराज, विशाल व त्याचा मित्र यांच्यामुळेच हा देशद्रोही पकडला गेला होता.


आज अनंत चतुर्दशीचा दिवस होता. गणपती बाप्पाचे विसर्जन करण्याची तयारी चालु होती. एवढे दिवस खुणाचा मास्टरमाइंड शोधणाऱ्या सचिनच्या मनात त्या गुन्हेगारांना मारणारा कोण ? हा प्रश्न येत होता. तेवढ्यात फोन वाजला. अनोळखी नंबर, पलिकडुन तोच आवाज “साहेब अभिनंदन, इकबाल सापडला ना.” सचिनने कॉल रेकॉर्डिंगवर टाकला आणि जरा नाराजीतच म्हणाला “पण, खरा खुनी सापडलाच नाही”.

“अहो, खुनी काय म्हणता. देशभक्त म्हणा. अश्या अतिरेकी लोकांना गोळ्या घालूनच मारायला हव. हे कुठुन येतात काय आणि आपल्या लोकांना मारून जातात काय. कशाचाच पत्ता लागत नाही. आपण काय फक्त मरण्यासाठीच जन्माला आलो का ? आपल्या समाज व्यवस्थेतही यांना कळत नकळत मदत करणारे अनेक लोक आहेत. काही कागदी नोटांच्या आमिषापोटी देशाशी गद्दारी करतात. यांना काहीच लाजा वाटत नाही. अश्या सगळ्या नराधमांना ठोकुनच टाकले पाहिजे. आपण कोणीही असू, एक आर्मी ऑफिसर, जीप ड्रायव्हर अथवा एक देशभक्त आपण देशासाठी लढु शकतो हे महत्वाचे. बाकी कायदा, तुमचे पोलीस प्रशासन काय करेल याची मला फिकीर नाही. आजपर्यंत अश्यांना पकडुन काही सापडले नाही याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांना मदत करणारे लगेच उभे राहतात. त्यामुळे आम्ही आमचे काम करणारच.” तो एकदम पोटतिकडीने बोलत होता. त्याचे विचार तो मांडत होता. सचिनला बरेच मुद्दे सापडले होते. तेवढ्यात कॉल कट झाला. सचिनने ताबडतोब ते संभाषण दिघे सरांना पाठवले व कॉल केला. दिघे सर ते ऐकुन सचिनच्या कामावर खुश झाले. आता सर, यावर ताबडतोब कार्यवाही करून या माणसाला पकडण्यासाठी टीम लावतील असे सचिनला वाटले.


सर म्हणाले “सचिन तू खूप मोठे काम केले आहेस. तुझे कौतुक व्हायलाच हवे. अतिरेकी गोटाला सामील असलेला इकबाल सारखा माणूस सापडला. ते चौघे कोण होते व का मारले गेले ते कळाले. इकबालने शस्त्रे कुठे लपुन ठेवली आहेत ते सांगितले आहे. आता राहिला तो अनोळखी माणूस. त्या माणसाच्या बोलण्यात जरा तथ्य आहे रे. आता हेच बघा ना. आमच्या टीमलाही हे सगळे शोधता आले असते. परंतु नाही जमले. आणि समजा एखाद्याला काही हाती लागले की तथाकथित पुढारी, पत्रकार, वकील आहेतच. आम्ही केलेला तपास कसा खोटा आहे हे सांगायला. कधीकधी तर मन इतके विषन्न होते ना की, वाटते हे असे देशभक्त परवडले. कायदा हातात घेतात पण काय ते सोक्षमोक्ष तरी लावतात. कुणाला उत्तर देणे नाही आणि चांगले काम केले तरी शिव्या खाणे नाही. चल जाऊ दे. तु कोणाला काही बोलु नकोस. बघु नंतर काय ते. आता बंदोबस्ताला जायचे आहे “. सरांसारख्या ईमानदार माणसाची निराशा स्पष्ट जाणवत होती.


संध्याकाळी सचिनचा फोन वाजला. परत अनोळखी नंबर. तोच आवाज “काय सचिनराव? काय म्हणाले दिघे साहेब… आम्हाला शोधायचा श्रीगणेशा करताय की… गणपती बाप्पा मोरया..” सचिनला हसु आले तो म्हणाला “गणपती बाप्पा मोरया..हा हा “. तो माणूसही खळाळुन हसला व फोन कट झाला.

सात महिने काहीच धागेदोरे हाती न लागणाऱ्या केसचा निकाल गणरायाने अकरा दिवसात लावला होता. गणपती बाप्पा मोरया !!

समाप्त.

एक अशीही रात्र ….

शब्दांकन: अनिरुद्ध शिर्के

या लेखाची ऑडिओ क्लिप आहे.

“सो गया ये जहॅां, सो गया आसमां …” गाडीत ‘तेजाब’ चित्रपटाचे गाणे ऐकत चाललो होतो. गावावरून परतताना रात्रीचे 1 वाजले होते. निघायला जरा उशीरच झाला होता. अजुन दीड एक तासाचा प्रवास शिल्लक होता. नाही म्हणता कंटाळा आलाच होता. त्यात पाऊसाची रिपरिप चालु होती. साधारणतः 20 कि.मी. नंतर हायवे येणार होता.

आता उसाची क्षेत्र संपून बांबूची वने लागली होती. गाडीचा हेडलाईट पोहचेल एव्हढेच दिसतं होते. बाकी दाट झाडी व त्यांना कवटाळुन बसलेला अंधार यामुळे काहीच कळत नव्हते. देवदैठण गावचा ओढा पार केला. गाडी ओढ्यातुन वर काढली तसे रस्त्याच्या डाव्याबाजुला कोणी तरी उभे आहे असे वाटले. गाडी हळु करून बिमर मारून पाहिला.

एक पांढरा कुडता घातलेली स्त्री, बहुतेक ओढणीखाली हातात एक बाळ, हातात छत्री, सोबत एक कपड्यांची बॅग अश्या लवाजम्यासह उभी होती. एवढ्या पावसात, इतक्या रात्री, एखादी स्त्री, लहान बाळासह असे रस्त्यावर कसे काय उभी असेल ही शंका मनात आली. तेवढ्यात ती स्त्री गाडीपुढे आडवी आली व गाडी थांबवण्याची विनंती करू लागली.

मी एकदम गडबडुन गेलो, काय करावे? थांबु की नको. असे रात्री थांबणे योग्य आहे का? असा मनातील गोंधळ वाढला. एव्हाना गाडी तिच्यापर्यंत पोहोचणार की, मी एकदम करकचून ब्रेक लावला व गाडी थांबविली. माझा पुढे तोल गेला व स्टिअरिंगवर जाऊन आपटणारच होतो.. पण स्वतःला सावरले. हळुच समोर पाहिले तर …तर ती स्त्री गायब… पुरता हादरून गेलो…. कुठे गेली असेल हा विचारच करत होतो की डाव्या काचेवर कुणीतरी टक टक वाजवले. मी हळुच मान फिरवली तर तीच बाई( मुद्दाम स्त्री नाही म्हणत, कारण माझी अवस्था तशीच होती)…तीच बाई चेहरयावर स्मितहास्य करत दार उघड म्हणुन सांगत होती.

माझेही हात नकळत बटणाकडे गेले व गाडी उघडली. जणु कोणी माझा हात पकडून ते करून घेत होते. झटकण तिने दार उघडले. पण का कुणास ठाऊक त्या वेळी माझ्या गाडीचे दार ..’करररर…..ररररर’ असे वाजल्यासारखे वाटले. बाहेर पाऊस पडत होता परंतु एसी गाडीत मी घामाने भिजलो होतो. त्या बाईने अगोदर तिची बॅग ठेवली व नंतर ओढणीखालील बाळाला संभाळत स्वतः गाडीत बसली. धाडकन दरवाजा बंद केला.

‘बर झाल तुम्ही गाडी थांबवली, मी खुप वेळ वाट पाहत होते. पण एकही गाडी यायना. आली तर थांबणा. तुमची गाडी आली, तुम्ही थांबलात. माझ कामच झाल.’ असे बोलुन तिने एक पॉज घेतला. माझ्या काळजात एकदम धस्स झाले. आजपर्यंत पाहिलेले सगळे भूताचे चित्रपट, मालिका, त्यातले प्रसंग सगळ्यांची उजळणी होत होती. ‘तुमचे उपकार झाले पाहुण. चला आता.’ या तिच्या शेवटच्या वाक्याने जरा धीर आला. मी गाडी चालु केली. परंतु माझे डोके काम करत नव्हते. नको ते विचार मनात यायला लागले होते. कोण असेल ही ? एवढ्या रात्री काय करत असेल? नक्की माणूसच आहे ना ….की ..की भुत…

पुढे परत कोणी तरी वयोवृद्ध स्त्री, पुरूष उभे आहेत, हात करत आहे असे वाटले. तेवढ्यात तिने ‘अजिबात गाडी थांबवु नका, कुठ बी गाडी थांबवली तर चांगल नाही होणार ‘ असे फर्मान सोडले. मी फक्त मान डोलावली व गाडी भरधाव वेगाने पुढे घेतली. माझी चांगलीच बोबडी वळली होती. शब्दच फुटत नव्हते. खुप वेळ तसाच गेला.

‘तुम्ही काय पुण्याला चाललाय?’ त्या बाईच्या प्रश्नाने मी भानावर आलो. मी अडखळतच ‘अ.अम..हो…हो’ म्हटले व पुन्हा शांत बसलो. बराच वेळ शांत बसल्यावर तिने पुन्हा विचारले ‘मला कुठे जायचे ते नाही विचारले?’. पुन्हा शाॅक बसला. ते खरेच होते. मी तिला गाडीत घेतले परंतु कुठे जायचे हे विचारलेच नाही. त्यात तिची विचारायची पध्दत फारच वेगळी होती. सोबत एक तिरका कटाक्ष. खरेतर त्यावेळची माझी अवस्था वण॔न करण्यासारखी नव्हतीच. मी इतका घाबरलो होतो की मला गाणीही ऐकु येत नव्हती, गाडी चालु आहे का? असल्यास गाडीचा वेगही माहित नव्हता. फक्त पुढे फिरणारे वायपर दिसत होते व अॅकसलेटरवर पाय होता.

काही वेळाने गाडी हायवेला लागली. एक दोन ट्रक पास झाले, मग मी जरा भानावर आलो. तिच्याकडे हळुच बघितले तर ती बाई ओढणीआड बाळाला नीट करत होती. बाळ बहुतेक झोपले असावे कारण ते नीट दिसत नव्हते व त्याचा काहीच आवाज येत नव्हता. ‘मी हिला गाडीत का घेतले? कोण आहे? त्या ओढ्याच्यापुढे काय करत असेल? इतक्या रात्री कुठे चालली काही माहिती नाही? ‘ माझ्या मनात प्रश्नांची गर्दी वाढत होती.

मी घाबरतच विचारले, ‘तुम्ही कुठे राहता?’ तिने वळुन पाहिले व म्हणाली ‘विचारलाच का प्रश्न, नका काळजी करू. कळेलच लवकर’. पुन्हा छातीत धस्स झाले. काय उत्तर होते. या तिच्या उत्तरावर विक्रम वेताळही आठवुन झाले.

घोडनदी ओलांडून काही वेळ झाला असेल. तोच ‘गाडी जरा हळु करा, मला उतरायची जागा आली’ या तिच्या वाक्याने मी परत सावरलो. गाडी हळु केली. परंतु मला कुठेही वस्ती दिसेना. पुढे, डावीकडे, उजवीकडे सगळीकडे पाहत होतो. पण कुणाचा मागमूसही नव्हता.
एक वळण झाले व ‘गाडी थांबवा’ तिचा आदेश आला. मी गाडी बाजूला घेतली. तिने ताडकन दरवाजा उघडला. तिचे सगळे सामान घेऊन ती उतरली. परत एक कटाक्ष टाकत ‘तुम्ही इथेच थांबा. मी आलेच’ म्हणाली व ती वळाली. मी तिच्या पाठमोरया आकृतीकडे पाहत होतो. ती सरळ चालते ना, तिचे पाय सरळ आहेत की उलटे, हात किती लांब आहेत, जेवढे अगाध ज्ञान चित्रपट, मालिका यातुन मिळाले होते त्याआधारे पाहण्याचा प्रयत्न करत होतो.

रस्त्यापासुन जरा खाली असलेल्या वावरात एका घराच्या दिशेने ती गेली. रात्रीच्या भयाण शांततेत रातकिड्यांचा किर..किर.. आवाजही डिजेसारखा मोठा वाटत होता. ती घराजवळ गेली. तिने दरवाज्या वाजवला. थोड्या वेळाने दरवाजा उघडला गेला. ती आत गेली. परत भयान शांतता. आता पुढे काय? हा विचार चालू होता तितक्यात एक म्हातारा घरातुन बाहेर आला. हातात कंदील घेऊन तो काठी टेकवत माझ्याकडे आला. पाठोपाठ ती बाईही आली.

म्हातारयाने कपाळावर आठया पाडुन माझ्याकडे पाहिले. घसा खाकरून मला विचारले ‘एवढ्या रातच कुठ निघाल पावणं?’. मला त्यांचा आवाज ए के हंगल सारखा वाटला. मी काही बोलणार इतक्यात ‘ते पुण्याचं पावण हाईत’ ती बाई बोलली. पुन्हा छदम हास्य. याच हास्याने माझी गभ॔गळीत अवस्था केली होती.

‘अव इतक्या रातच्याला एकट नका फिरत जाऊ. जागा चांगल्या नाहीत.’ तो म्हातारा बोलु लागला तितक्यात ‘दिसलं की आम्हाला एक जोडप, हात करत होत, पण मीच गाडी नाही थांबु दिली’ ती बाई बोलली. ‘अहो, हि आमची लेक. तालुक्याच्या ठिकाणी असती. मुक्कामी एसटीने यायला निघाली तर एसटीचा घोटाळा झाला. पुढ पायी निघाली. कुणीबी तिच्यासाठी थांबणा.’ म्हातारे बाबा पोटतिकडीने सांगु लागले.’तुम्ही गाडी थांबवावी म्हणुन मी सोबत बाळ हाय अस खोट दावल’ त्या म्हातारयाला थांबवत मध्येच ती स्त्री म्हणाली ( हो स्त्री ..कारण आता माझे चित्त थारेवर येऊ लागले होते).

म्हणजे मला हिने वेडयात काढले होते. तिने कापडाचा गुंडाळा करून बाळ असल्याचं भासवल होत. तिच्या स्त्री चातुर्याचे मला कौतुक वाटु लागले होते. तरी बाळ हालचाल कसे करत नाही ही माझ्या मनातील शंका बरोबर होती. फक्त मी घाबरलो होतो म्हणुन सुचले नाही.

‘माझ्या पोरीला सुखरूप घरी पोहचवल. आज तुमच्या रूपात ईठठलच भेटला.’ असे म्हणुन त्यांनी हात जोडले. त्या म्हातारया आजोबांच्या डोळ्यात पाणी आले होते. एका बापालाच पोरीची खरी काळजी असते. तितक्यात त्या स्त्रीने हातातील एक पिशवी गाडीत ठेवली. ‘पपई आणि कणस हायेत. तुमच्या लेकराबाळांसाठी घेऊन जा. आत्याने दिले म्हणुन सांगा.’ त्या ताईचे ते उदगार ऐकुन मन भरून आले. मी ‘हो ताई ‘ म्हटले व मान डोलावली.’ ‘शिस्तीत जाऊ द्या ‘ त्या म्हातारया आजोबांनी आज्ञा केली.

मी जड अंतःकरणाने त्यांचा निरोप घेतला व तिथुन निघालो. गाडीच्या आरशात पाहिले ते दोघे बराच वेळ दिसत होते. त्यांच्या अनपेक्षित प्रेमाने माझे डोळे भरून आले होते. कुठे मी भुताटकीचा विचार करत होतो व कुठे संकटात सापडलेली ती ताई खंबीरपणे लढा देत होती. माझे मलाच हसु आले.

मुड बदलण्यासाठी गाणी लावली तर पुन्हा ‘सो गया ये जहॅां, सो गया आसमां …’ हेच गाणे लागले. पटकन ते बंद केले. एक मिनिट शांततेत गेला. याच गाण्यानंतर सगळा प्रसंग घडला होता. पुन्हा खळाळुन हसायला लागलो.

खरेतर त्या रात्रीच्या वेळी जग झोपले होते परंतु मी मानवी जीवनातील माणूसकीच्या रम्य पहाटेची चाहुल अनुभवत होतो.

समाप्त.

चटका..

संध्याकाळची वेळ होती…  चुरगळलेला टी शर्ट नीट केला. आरशात छोट्या दाताच्या कंगव्याने केस नीट करत होतो. शेजारच्या निगडे काकुंच्या रेडिओवर अरजीत सिंगचे मस्त गाणे लागलेले होते. आज, माझे आणि रघ्याचे मराठी शाळेच्या मैदानावर मॅच खेळायला जायचे पक्के ठरले होते. मला तसा उशीरच झाला होता. पायात चप्पल घालतच होतो कि आईने आवाज दिला. “समीर, दळण घेऊन जा आणि तु थांबुन करूनच घेऊन ये. बारीक द्यायला सांग त्याला…”. आईची झपकन गुगली येऊन मी बोल्ड झालो होतो. कालच, मला आईने तिचे न ऐकल्याने, चांगलाच धुतला असल्याने, आईशी वाद घालण्यात अर्थ नव्हता.    

नाईलाजानेच दळणाची पिशवी उचलली आणि सायकलला लटकवली. दळणामुळे सायकलचा बॅलन्स जमणार नाही हे माहित असल्याने, सायकल हातात धरून, चालतच निघालो होतो. शेजारची कोमली मैत्रिणींबरोबर खेळत होती व माझ्याकडे बघुन हसली. आई नेमके अशाच वेळी दळणाला का पाठवते, याचा राग आला. 

कोपऱ्यावरच्या रमेशशेठच्या दुकानापुढे गेलो असेंन तेवढ्यात “माझा रामा सापडला,माझा रामा सापडला” असा आवाज कानावर आला.

विस्कटलेले पांढरे केस, लाल रंगाची साडी, कपाळावर ठसठशीत कुंकू, खांदयावर एक शबनम, डाव्या हाताला कसला तरी दोरा बांधलेला असा अवतार असलेली एक म्हातारी, ओरडत पळत येत होती. मी मागे, पुढे, इकडे, तिकडे पाहू लागलो परंतु रस्त्यात मी एकटाच उभा होतो आणि ती म्हातारी माझ्या दिशेनेच येत होती. मी तर पुरता गांगरून गेलो. काय करावे काही कळत नव्हते. सायकल सोडुन पळावे तर दळणाची वाट लागणार हे पक्के होते. तेवढ्यात तिने मला गाठले व माझ्या तोंडावरून हात फिरवु लागली.

“माझा रामा सापडला ग बाई. माझा रामा सापडला. लेकरा कुठे गेला होतास? किती शोधले रे मी तुला…” असे म्हणत ती माझ्या तोंडावरून हात फिरवत होती. तिच्या स्पर्शात प्रेमाचा ओलावा होता. क्षणभर, मी खरेच तिचा रामा आहे की काय असा विचार मनात आला. मला थोडी भिती वाटु लागली होती व कुतुहलही निर्माण झाले होते. काय होत आहे मला काहीच कळत नव्हते.

माझी अवस्था गल्लीतल्या माणसांच्या लक्षात आली होती. तितक्यात रमेशशेठची आई त्याच्या दुकानातुन बाहेर आली. गल्लीत तिचा दरारा होता. माझ्याजवळ येऊन तिने त्या म्हातारीला बाजुला ढकलले. ती माझ्या व म्हातारीच्यामध्ये उभी राहिली. माझ्यासाठी हा जणु चित्रपटाचाच सीन होता. “कोण ग तु ? आमच्या पोराला का त्रास देतीस? पोलिसांना बोलवु का ?” रमेशशेठच्या आईने दरडावतच तिला विचारले.

“हा..हा माझा मुलगा रामा आहे. ये रामा, माझ्याकडे ये. माझ्या सोन्या कुठ होतास रे…” ती म्हातारी परत सुरू झाली. तिला मला जवळ घ्यायचेच होते. पण रमेशशेठच्या आईपुढे तिचे काही चालेना. या सगळ्यात मी मात्र पुरता घामाघुम झालो होतो. “ओ ..ओ आज्जी, काही बडबडु …नका. मी ..मी समीर नखाते आहे. नगरपालिकेच्या शाळेत नववी ब तुकडीत..” जणु एखाद्याने मुलाखतीसाठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे मी बोलत होतो.

एव्हाना गल्लीतली माणसे जमा झाली होती. माझी आईही तिथे आली. सगळ्यांनी समजावुन, धमकावुन पाहिले. पण ती म्हातारी काही ऐकेना. रमेशशेठ पोलिसांना फोन लावण्याचा प्रयत्न करायला लागले. तेवढ्यात “बाजुला सरका, बाजुला सरका..” आवाज कानावर पडला. टी शर्ट व जीन्स घातलेली दोन माणसे गर्दीतुन वाट काढत पुढे आली.

“आई, कुठे गेली होतीस. इकडे कशी आलीस. किती शोधले तुला. चल बघु घरी.” त्यातला एकजण त्या म्हातारीला म्हणाला. “अरे दादा, हा बघ आपला रामा..आपला रामा सापडला रे. माझ लेकरू सापडल. बघ, बघ कसा वाळला आहे.” म्हातारीचे हे वाक्य संपताच सगळे माझ्याकडे बघु लागले. त्या कोमली व तिच्या मैत्रिणींना म्हातारीच्या शेवटच्या वाक्यावर जाम हसु आले होते.

आता रमेशशेठ पुढे झाले व त्या माणसांशी बोलु लागले. थोड्या वेळात सगळा उलगडा होऊ लागला. त्या म्हातारीला तीन मुले होती. खुप वर्षापुर्वी तिचा धाकटा मुलगा किरकोळ कारणांमुळे घरातुन रागावुन बाहेर पडला. तो काही परतलाच नाही. त्यांनी खुप शोधले. परंतु त्याचा काही पत्ता लागला नाही. त्याच्या अकस्मात जाण्याने ही माऊली कायमची खचली होती.

“आमचा भाऊ घरातुन गेला त्यावेळी साधारण या मुलाच्या वयाचाच होता. तेव्हापासुन आई, असा कोणी मुलगा दिसला की त्याला रामा म्हणते. तसे आम्ही तिला बाहेर सोडत नाही. पण आज रामनवमी असल्याने तिला रामाच्या मंदिरात घेऊन गेलो होतो. पुरूषांची रांग जास्त असल्याने आम्हाला वेळ लागला. बाहेर येऊन पाहतो तर आई गायब. शोधत शोधत इथपर्यंत पोहोचलो. झाल्या प्रकाराबद्दल, आम्ही तुमची माफी मागतो. बाळा तु घाबरला नाहीस ना?” त्या माणसाने माझ्या खांद्यावर हात टाकत विचारले. मी ही चेहऱ्यावर समजुतदारपणा दाखवत, नाही म्हणुन मान डोलावली.

आता गर्दी पांगली होती. बाबाही कामावरून परतले होते. त्यांनी माझ्याकडुन सायकल काढुन घेतली. मी, ती म्हातारी व तिच्या दोन्ही मुलांना पाहत होतो. तेवढ्यात म्हातारी पुन्हा धावत माझ्याकडे झेपावली व माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवुन ” माझा रामा..” म्हणाली. आता मात्र माझ्या अंगावर सरकन काटा आला… ती माणसे तिला पुन्हा ओढुन घेऊन जाऊ लागली. मी त्यांच्याकडे पाहत तसाच उभा होतो.

आज रामनवमीला, नियतीने एका मातेला तिच्या रामाबरोबर क्षणभर भेट घडवली होती. तिला काही क्षणांसाठी का होईना, आनंद मिळाला होता. खरेतर यात समाधान मानावे की, हे सारे मृगजळ आहे, खरा रामा अजुन वनवासातुन आलाच नाही, त्या कौसल्येला तिचा रामा अजुन भेटलाच नाही याबद्दल हळहळ वाटावी. मला हसावे की रडावे काही काही कळत नव्हते. पण ही रामनवमी माझ्या मनाला चटका लावून गेली ती कायमचीच…

माजी विद्यार्थी स्नेह मेळावा 1995 बॅच – एक वर्षपुर्ती

सोबत गुरु शिष्य या नात्याला उजाळा..

सर्वाधिक प्रामाणिक, तरल, स्वच्छ नाते म्हणजे गुरू शिष्याचे नाते. याचा श्रीगणेशा जिथे होतो, त्या शालेय जीवनातील गुरूंना व सवंगडयांना तब्बल 25 वर्षांनी भेटण्याची संधी, आमच्या मित्र-मैत्रिणींनी उपलब्ध करून दिली. 9 जुन 2019 रोजी या भेटीचा योग आला होता.

शारीरिक आकारमानात बरेच बदल झालेले हरहुन्नरी शालेय मित्रमैत्रिणी यांनाही या प्रदीर्घ कालानंतर भेटत होतो. सध्या तब्बल चाळीशीत असुनही गुरूजणांनी ‘बाळा, बछडा’ अशी प्रेमाने हाक मारून, गालावर हात फिरवत कौतुक केले आणि जणु आकाश ठेंगणे वाटु लागले.

निवृत्तीनंतर ज्या मातीचा स्पर्श आपण मुकलो आहोत, एकेकाळी जिथे आपण ज्ञानदानाच्या क्षेत्रात हुकुमत गाजवली त्या प्रांगणात, आपल्याला ढोल, ताश्यांच्या🥁 गजरात कोणी स्वागत करेल अशी कल्पना नसलेले शिक्षकवृंदही मनातुन आनंदी झाले होते.

कार्यक्रमाची औपचारिकता सोडून दिल्यास प्रत्येकाच्या मनात एक विश्वास, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम ओतप्रोत भरले गेले. आपल्या शिक्षकांप्रती असलेला आदराचा सुगंध सगळीकडे पसरला होता. तसेच एका छानश्या रोपट्याला खतपाणी घालुन त्याची उत्तम वाढ झाल्यावर चेहरयावर ओसंडून वाहणारा अभिमान प्रत्येक शिक्षकांच्या ठायी दिसत होता.

अशा प्रसंगी काही नाती अशीच टिकावीत, हा सहवास असाच वाढत जावा हि भावना मनात निर्माण झाल्याशिवाय राहवत नाही. म्हणतात ना “नाती, मैत्री आणि प्रेम परिपुर्ण तिथेच होतात, जिथे त्यांना आदर आणि आपुलकी मिळते”.

आज तब्बल एक वर्ष सरले आहे, परंतु चित्रपटातील फ्लॅशबॅकप्रमाणे सगळे डोळ्यासमोर तरळत आहे. हे नाते, हा जिव्हाळा, ही आपुलकी कधीच तुटू नये अशीच भोळीभाबडी ईच्छा सर्वांच्याच मनात कायम दाटुन राहील हे निश्चित.

मला खात्री आहे अश्या भेटीने सगळीच मने तरूण झाली असतील. आजही प्रत्येक मनामध्ये सर्वांना पुन्हा भेटता येईल का? हा विचार मनात येत असेलच. संधी मिळताच त्यावर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न निश्चित करू.

आदरणीय गुरूजण, आपण आजवर दिलेल्या संस्कारांचा वारसा, विचारांची शिदोरी याबद्दल सर्व शिष्यमित्रद्वयीं तर्फे सर्व गुरूजणांचे मनपुव॔क आभार मानतो. आपला स्नेह असाच राहु द्यात.

सर्वच मित्र मैत्रिणींचे मनापासुन आभार !!

मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली, तुमच्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली…. “

आपल्या प्रेमाबद्दल सदैव ऋणी राहील.

सर्वांनी सुरक्षित रहा. काळजी घ्या

अनिरुद्ध शिर्के

पप्पा एक अष्टपैलू व्यक्तिमत्व…..

शब्दांकन: अनिरुद्ध शिर्के

बाप असतो जरा जरा,
नारळाच्या फळा वानी,
बाहेरून कठोर भासे,
आतमध्ये गोड पाणी |
पावसाचं महत्व सुद्धा,
कळेना झालंय मोराला |
तसाच बाप कळत नाही,
जीवंत पणी पोराला |

अहमदनगर जिल्ह्यातील श्रिगोंदा तालुक्यातील निंबवी सारख्या छोट्याशा गावातुन एक तरूण मोठया बंधुच्या आग्रहाखातर शिक्षणासाठी पुण्यात येतो. नामांकित शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेतो व एका शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करतो. आपल्या कष्टाळू व प्रामाणिक वृत्तीने शून्यातून विश्व निर्माण करतो परंतु आपली गावासोबत असलेली नाळ काही तुटू देत नाही. आयुष्यात सर्व सुखसोयी उपलब्ध असतानाही आपले पाय जमिनीवर ठेऊन नम्रतेने आपले कर्तव्य बजावत या जगाचा निरोप घेतो….प्रेम, करूणा,जिव्हाळा, आपुलकी, माणुसकी, यांनी ओतप्रोत भरलेला सच्चा मित्र, मार्गदर्शक, गुरू, आधारवड असे आपले बहुरंगी जीवन समाजाला एक खुले पुस्तक म्हणुन उपलब्ध करून देणारे आमचे वडील श्री. सोपानराव शिर्के उर्फ काका यांचे जीवन खुपच प्रेरणादायी होते.

त्यांचे नाव घेताच भारदस्त आवाज, काटक शरीर, व हसरा चेहरा आपल्या डोळ्यासमोर तरळू लागतो.

त्यांचे प्राथमिक शिक्षण निंबवीतील भैरवनाथ विदयालय येथे झाले. फार मोठे व आर्थिकदृष्ट्या संपन्न कुटुंब, गावातील पहिली दुमजली माडी असलेला वाडा, पंचक्रोशीत व्यापार असणारे प्रचंड उलाढाल असणारे दुकान असा वारसा लाभला तर माणसाच्या अंगी अवगुणांचा संचार होण्यास वेळ लागत नाही परंतु याही परिस्थितीत आदर्श गुणांचा अंगिकार करून, सर्व प्रलोभनांपासुन दुर राहुन स्वतःचे वेगळेपण जपणे हे केवळ संत प्रवृतीचे लोकच करू शकतात. पप्पा हे असे जीवन जगले, त्यांचे नावही संताचे होते त्यामुळे हा दुर्मिळ योगच म्हणावा लागेल.

पुढे शिक्षणासाठी मिलटरी बॉईज होस्टेल, अहमदनगर, आलेगावकर शाळा, स. प. महाविद्यालय, नगर कॉलेज, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अश्या नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांचे शिक्षण झाले. डबल पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण, व सोबत खेळाची प्रचंड आवड असल्याने कॉलेज, विद्यापीठाचेही प्रतिनिधित्व केलेले असे अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांनी जोपासले होते. त्यांच्या शालेय, कॉलेज जीवनातील मित्रांना याची नक्कीच आठवण येत असेल.

ज्या शाळेत शिकलो तिथेच म्हणजे आलेगावकर माध्यमिक विदयालय, खडकी येथे शिक्षक म्हणून नोकरी करण्याचा दुर्मिळ बहुमान त्यांच्या वाट्याला आला होता. त्याचवेळी सैन्यदलात भरती होण्याची संधीही चालून आली होती परंतु शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान देऊन पुढील पिढींना मार्गदर्शन करण्याचा मार्ग त्यांनी निवडला. स्पष्टवक्तेपणा, निर्भिडवृत्ती यामुळे ते सहकारयांमध्ये जाणले जात. एखादा सहकारी अडचणीत आहे हे कळाले की मदतीस तत्परतेने हजर हा मैत्रगुण त्यांनी आयुष्यभर जपला. आपले सहकारीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबाशीही सौदार्हयाचे संबंध त्यांनी जपले. आयुष्यात आलेली माणसे उगाच आलेली नसतात त्यामागे नक्कीच काहितरी कारण असते आपण केवळ ॠणाणुबंध जपण्याचे काम करावे हीच त्यांची विचारसरणी होती.

शाळेत विद्यार्थी वर्गामध्ये त्यांच्याविषयी आदरयुकत भिती नेहमीच जाणवत असे. त्यांच्यासमोर उभे राहणे म्हणजे ‘चुकीला माफी नाही’ हे विद्यार्थांना पक्के ठाऊक होते. चुक झाली की धपाटा घालणारा त्यांचा हात कौतुकासाठीही तितकाच तत्परतेने पाठीवर पडत असे. मग समोरच्याच्या चेहर्यावर हास्य व अभिमान सहजपणे येत असे. एकदा शालेय शिक्षण पुर्ण झाले की ते समोरच्या विद्यार्थ्याला प्रेमपुव॔क मैत्रीची वागणुक देत. अगदी त्याच्या आई-वडिलांपासुन मुलाबाळांपर्यंत सर्वांची आपुलकीने चौकशी करत असत. वेळप्रसंगी सल्लाही देत. आम्हा तिनही भावंडांचेही शिक्षण ते शिकवत असलेल्या आलेगावकर विदयालय मध्येच झाले. परंतु स्वतःची मुले म्हणून आम्हाला त्यांनी कधी वेगळी वागणूक दिली नाही. इतर मुलांबरोबरच एक विद्यार्थी म्हणुनच वागविले. वरवर सोपे वाटणारी ही गोष्ट तशी किती अवघड असते हे एका शिक्षकालाच माहित. खरेतर सापत्न वागणुक त्यांना कधी जमलीच नाही.

आजच्या गतीमान जीवनात नाती जपणे तसे अवघडच. त्यात प्रचंड गोतावळ्यात शहरात नोकरीची तारेवरची कसरत करून नाती जपणे हे फक्त सोपानकाकांनाच जमते… हे त्यांच्याशी संबंधित सर्वच नातेवाईकांचे उदगार त्यांच्या वेगळेपणाची पावती देतात. चुलते, भाऊ,बहीणी, मेव्हणा, मेव्हणी, भाचे, भाची, पुतणे, पुतणी ही नाती जपताना त्यांनी कधीच सख्खा, चुलत, मावस हा भेदभाव केला नाही. त्यामुळे ते सर्वांनाच आपलेसे वाटत. प्रत्येकाची त्यांच्यासोबत एक घट्ट मैत्री ठरलेलीच. प्रत्येकाची आस्थेने चौकशी करणे हा त्यांचा स्वभावगुण. सर्वांच्याच मनात त्या आठवणी उचंबळून येत असतील ..कोणाचाही कोणताही कार्यक्रम असो त्यांची उपस्थिती ठरलेलीच. कार्यक्रमास पोहोचण्यास उशीर झालेला त्यांना आवडत नसे. वेळेवर उपस्थित राहणे हे आपले कर्तव्य आहे हा त्यांचा आग्रह असे. कार्यक्रमास उपस्थित सर्वांची गाठभेट घेतल्याशिवाय तिथुन हलायचे नाही हा शिरस्ता त्यांनी कायम जपला.

अनेक वर्ष शहरात राहुनही गावाविषयी त्यांची आस्था, ओढ कधीही तसूभरही कमी झाली नाही. त्यांना गावाविषयी किती आत्मियता होती हे त्यांना भेटालेलया प्रत्येक व्यक्तीस ठाऊक आहे. कुठल्याही राज्यास, देशास भेट दिली की त्यातील कुठली चांगली गोष्ट आपण गावासाठी करू शकतो याबद्दल ते नेहमी चर्चा करत. गावातील कोणीही व्यक्ती कुठेही भेटो अथवा त्याबद्दल माहिती मिळो त्यांना प्रचंड आनंद व्हायचा. गावची ओढ आणि शेती विषयक आवड, यामुळे गेले कित्येक वर्ष, तोट्यातील शेती त्यांनी पुणे शहरातून येऊन जाऊन आवडीने केली.

सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान खुपच वेगळेपण जपणारे होते. कुठलाही मोबदला अपेक्षित न धरता ते समोरच्याला मदत करीत असत. एखाद्याचे नोकरी विषयक काम असो, आर्थिक अडचण असो वा लग्न स्थळ सुचविणे असो त्यांनी नेहमीच समर्पित भुमिका बजावली. कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसताना त्यांचा जनसंपर्क वाखाणण्याजोगा होता. त्यांचा स्वभाव खुप सहजसुंदर व वेगळा होता हे त्यांना ओळखत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे उदगार असतात.

समाजातील अनेक घटकांना वैद्यकीय उपचार परवडत नाहीत. यासाठी त्यांना अल्पदरात उपचार उपलब्ध करून देता येतील का, यावर बराच काळ विचार विनिमय करून, स्वतःच्या नावाची सामाजिक संस्था उभारून एक अभ्यासपुर्वक संकल्पना मांडण्यात त्यांनी निर्णायक भुमिका बजावली आहे. पुढील काळात त्याची फळे आपणांस दिसु लागतील.

पप्पांनी त्यांच्या आईवडिलांच्या उतारवयात केलेल्या सेवेची तुलना श्रावणबाळाशी केली तर गैर ठरू नये. आपल्यापैकी अनेकांनी ते स्वतः अनुभवले आहे. आपले वय, पद, प्रतिष्ठा यांचा मुलाहिजा न बाळगता मुलाने आपले कर्तव्य कसे बजावावे याचे आदर्श उदाहरण त्यांनी समाजासमोर ठेवले होते. माझ्या भावंडांनीही त्यांची अहोरात्र केलेली सेवा हे त्याच संस्कारांचे प्रतिक आहे.

आमच्या आईने त्यांना म्हणजे आपल्या पतीला, आलेल्या प्रत्येक संकटात, बिकट परिस्थितीत फारच खंबीर साथ देऊन, प्रसंगी खांद्याला खांदा देऊन संसाराचा गाडा उत्तम रितीने चालविला. तिने त्यांची केलेली सेवा याचे शब्दात वर्णन केवळ अशक्यच आहे. आजच्या युगात पतीची अशी सेवा करणारी पत्नी दुर्मिळच म्हणावी लागेल. आज तिचा मोठा आधार गेला आहे परंतु त्यांनी पाहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी ती झटुन प्रयत्न करेल यात शंका नाही.

अभिजीतदादाचे त्यांना फारच कौतुक असे. त्याच्या व्यवसायाच्या सुरवातीपासून ते खंबीरपणे त्याच्यासोबत उभे ठाकले. दादाची दुरदृष्टी, अभ्यासूवृत्ती, कष्ट करण्याची तयारी याचा त्यांना फार अभिमान वाटे. दादा हा काळाच्या फारच पुढे विचार करतो, रोजजीवन जगणारया व्यक्तीस त्याचे विचार लगेच पटत नाहीत परंतु नंतर ते पटतात असे ते नेहमी म्हणायचे.

अतुल घरातील शेंडेफळ असल्याने त्याच्याशी वेगळाच संवाद करत. काळजी व मार्गदर्शन दोन्हीचा तो मिलाफ असे. त्रिवेंद्रम येथे त्याने विक्रमी वेळेत क्रिकेट व फुटबॉलचे स्टेडियम उभारले हे सांगताना त्यांचा ऊर भरून आलेला असे व चेहरयावर अभिमान ओतप्रोत भरलेला असे.

तिनही सुना यांच्याशी त्यांचे नाते खुपच मनमोकळेपणाचे होते. एखाद्या विषयावर कोणीही सल्ला दिला की ते त्याचा विचार करीत असत. पाचही नातवंडे यांच्याशी त्यांचे वेगळेच मैत्रीचे नाते होते. नातवंडांचा हट्ट पुरविण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही.

माझे माझ्या वडिलांशी अनेक पदरी नाते होते…बाप-लेकाचे, गुरु-शिष्याचे, संस्थेच्या सह-संचालकाचे, मैत्रीचे ….पावलोपावली आम्हाला घडवणारे माझे वडील ..माझ्या आयुष्यातील होस्टेलमधील पहिला दिवस, पहिला विमान प्रवास सगळ्याचेच ते साक्षीदार होते. ते मला नेहमी सांगत….प्रयत्न करीत राहणे हे आपले कर्तव्य आहे, ते करीत रहा, कदाचित सगळेच मनासारखे घडणार नाही परंतु प्रयत्न केल्याचे समाधान निश्चित मिळेल….

कळायला आणि वाचता यायला लागले तेंव्हापासून “शिर्के सरांचे चिरंजीव” ही बिरूदावली आम्ही मिरवु लागलो. आज इतर कितीही उपाधी मिळाल्या तरीही ही ओळख मिरविण्याचा आमचा हक्क कायम अबाधित राहिल.

खरेतर त्यांच्या अकाली निधनाने पायाखालची जमीनच सरकली आहे. वडिलांची साथ असते तोपर्यंत जग वेगळे भासते परंतु ते सोबत नाहीत या केवळ विचारानेच मन सैरभैर झाले आहे. जीवनातील रंग फिके वाटु लागले आहेत 😔… त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत राहु. एक मात्र निश्चित यापुढेही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एका दिपस्तंभासारखे एक मार्गदर्शक म्हणुन ते नेहमीच सोबत असतील.

आयुष्यात त्यांनी अनेक शिष्य घडवले, अनेकांना पैलू पाडले…पण खरेतर ‘कोहिनूर ‘ एकच होता …ते स्वतः, माझे पप्पा.. तुमचे ..शिर्के सर / सोपान काका/ सोपान मामा … अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही !!!!
…………xxxx……….

मन जिंका जग जिंका…

मन म्हणजे, प्रत्येक माणसाला लाभलेले अजस्र, अफाट वरदान. ज्यावर स्वार होऊन सबंध विश्वात कुठेही सहज रपेट मारून येऊ शकतो. अगदी उत्तरधृव ते दक्षिणधृव प्रवास काही सेकंदात करता येतो. या मनाची अचुक नाडी ओळखुन त्यावर अंकुश ठेवता आला की जग जिंकल्याचा आनंद मिळतोच.

लहान मुले स्वछंदी, चंचल मनाची असतात. एखाद्या प्रसंगात मुले कशी वागतील हे त्यांच्या मनस्थितीवरून सहज ओळखता येते. मुल केवळ त्रागा करते, ऐकत नाही असे म्हणुन अंग झटकणया ऐवजी त्यांची मनस्थिती समजावून घेणे आवश्यक आहे. अगदी सोपा उपाय म्हणजे आपण त्या प्रसंगात कसे वागलो असतो हा विचार करणे, त्यानंतर त्यांची भुमिका समजावून घेणे. समोरच्याच्या मनाची स्थिती समजली की अनेकदा आपल्याला हवी असलेली उत्तरे सहज सापडतात, नात्यांतील सुसंवाद टिकतो.

जुई एकुलती एक मुलगी. अभ्यासात हुशार. शिवाय तिला नृत्य, खेळ सगळ्याचीच आवड. पण अचानक ती आई वडिलांशी मनमोकळ्या गप्पा मारेनाशी झाली, अभ्यासातील प्रतिसादही कमी झाला. तिच्या आवडी, निवडी बदलु लागल्या, वागण्यात तुसडेपणा वाढला. तिच्या आईच्या चाणाक्ष नजरेने मुलीमधील होणारे बदल हेरले. तिने माणसोपचार तज्ञांची मदत घेतली. त्यांना प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट ” ती व्यक्त होत नव्हती, तिला व्यक्त होण्यासाठी भावंडाची कमतरता जाणवत होती.” ते आता शक्य नसल्याने व मुलीचे वय वाढल्याने, आता आईनेच तिची मैत्रीण होण्याची गरज निर्माण झाली होती. आईने सकारात्मक प्रतिसाद दिला. मुलीची मैत्रीण म्हणुन जे काही बदल करता येतील ते करण्याचा प्रयत्न तिने केला. साहजिकच मुलगी खुलली. अभ्यास आणि खेळ या दोन्हीत छान प्रगती दिसु लागली. मुलांची कोवळी मने जिंकत राहिले की आयुष्यातील बदल सहज शक्य होतात.

निलेश तसा नाईलाजानेच इंजीनियर झाला, खरे तर त्याची आवड वेगळीच होती. पुढे बायकोही इंजीनियर मिळाली. अचानक थेट अमेरिकेत काम करण्याची संधी मिळाली. भारतातून निघताना आई, भाऊ, कुटुंब यांना सोडुन जाण्याचा प्रसंग आला की याचे ढसाढसा रडणे सुरू. ‘मला जावेसे वाटतच नाही’, ‘कशासाठी मी इंजीनियर झालो’. हे त्याचे उदगार मन व्यथित करून जातात. परंतु उज्वल भवितव्यासाठी काही दिवस जाऊ असे तो मनाला सांगुन वेळ निभाऊन नेत असतो. भावनिक प्रसंग हाताळतांना मनावर दगड ठेवावाच लागतो.

चाळीशी, पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या अनेक मनांना तर वाटते आपण पुन्हा एकदा लहान व्हावे, असलेली बंधने झुगारून स्वछंद बागडावे, मस्तपैकी जीवनाचा आस्वाद घ्यावा. यातुन अनेक मने प्रयत्न करतात काही यशस्वीही होतात. काही पाण्यात फक्त पाय ओले करावे त्याप्रमाणे कधीतरी थोडीफार बंडाळी करतात. काही बेडका प्रमाणे छोट्याशा विहिरीतच उड्या मारत राहतात. खरेतर झुरलेलया, थकल्या भागलेलया मनाला उभारी देण्यासाठी किमान काही प्रयत्न तरी निश्चित करायला हवे.

उतारवयात मनाचे खरया अर्थाने साम्राज्य असते. निवृत्तीमुळे भरपुर रिकामा वेळ, कमी झालेल्या जबाबदारया, तुटलेला संवाद, दुरावलेले नातेसंबंध, जीवनसाथीने अचानक सोडलेली साथ अश्या एक ना अनेक गोष्टी कारणीभूत असतात. रिकामा वेळ, रिकामे मन कुठे गुंतवावे हे ठरविणे आवश्यक आहे. टिव्ही मालिका, पेपर यांची दिवसातील काही वेळच सोबत असणे उत्तम. परंतु उपलब्ध वेळेचा, अनुभवाचा योग्य विनियोग केला, थोडक्यात मनाला गुंतवून ठेवले की अनेक उत्तम परिणाम साधता येतात. शरीर कितीही थकले तरी मनाने जर उभारी घेतली तर चमत्कारही घडतात.

मनावर, आचरणावर ताबा नसलेली व्यक्ति कुटुंब व समाज दोन्हीसाठी धोकादायक. मनाच्या वेगावर नियंत्रण ठेवून त्याला उत्तम विचार, छान संस्कार यांचे खतपाणी घातले की ते उत्तम फुलते. सुदृढ मन उत्तम वैयक्तिक व सामाजिक आरोग्याची चावी असे म्हटले तर वावगे ठरू नये.

अनिरुद्ध शिर्के ….

तयारी परदेशवारीची

 …. (पुणेरी उपहास वारी )

परदेशात जायचे म्हटले कि प्रत्येक माणसाच्या मनात व पोटात वेगळ्याच गुदगुल्या होणे सुरु होते. जाण्याचा बेत ठरल्यापासून, तो दिवस उजाडेपर्यंत मित्रांना व नातेवाईकांना वेगवेगळ्या पद्धतीने ” परदेशी जातोय” हा निरोप दिला जातो. “अरे भेटलो असतो पण, मी …जातोय, अजून खूप कामे बाकी आहेत (यात बरेच इंग्रजी शब्द वापरून) , तर आल्यावर भेटू “. काहींचा प्रयत्न तर समोरच्याच्या मनात विचारांचे काहूर माजले पाहिजे असा असतो. त्याचा अपेक्षित परिणाम झाला कि समोरचे मित्रही उगाच आपल्यालाही वेगवेगळ्या देशांना भेट देता येईल का ? किती खर्च येईल ? कोणत्या कंपनीचे तिकिट स्वस्तात मिळेल हे पाहत बसतात.

सध्याच्या इंटरनेट युगात तर सोशल नेटवर्किंग साईटवर, प्रवासाच्या किमान महिनाभर अगोदरपासून सगळे विचार मांडले जातात, प्रगती कळवली जाते. कोणत्या दुकानातून काय खरेदी केले इथपासून तिकडे जाऊन काय खाणार सगळे सगळे विचार मांडले जातात. मध्येच एखाद्या गाडीवर वडापाव खाताना पोस्ट टाकून “वडापाव मिस करणार.. ” असेही सांगितले जाते. मग काय भराभर लाईक्स टाकल्या जातात.  

प्रथमच परदेशी जाणाऱ्यांना थोडासा अनुभव असणारे शेजारी, मित्र जातायेता चौकशी करत, सोबत भरपूर ज्ञान देऊन जातात. घरातील वयोवृद्ध प्रवास करणार असतील तर विचारू नका. तरुणाला लाजवतील अशी धावपळ करतात. सोबत काय नेता येईल याची प्रचंड यादी केली जाते. जोडीने जाणार असतील तर कधी नव्हे ते बायकोसाठी शुज आणले जातात. साडीऐवजी सलवार कमीज अथवा जीन्स टी शर्ट विकत आणून तीनदा आपण कसे दिसतो हे पाहिले जाते. पुरुषदेखील नवीन टी शर्ट घालून, आरश्यासमोर उभे राहून, पोटावरून हाथ फिरवत “जरा पोट कमी करावे लागेल” हे नम्रपणे कबुल करतात. खरी मज्जा येते ती बॅग भरतेवेळी, शाळेतल्या अल्लड मुलांप्रमाणे बॅगेला किती कप्पे आहेत, कुठल्या कप्यात काय ठेवता येईल हे तपासले जाते. ती बॅग रोज रात्री व्यवस्थित ठेवून सकाळी पुन्हा उघडली जाते. एखाद्या बॅगेला इतिहास असेल, आणि त्यातहि तो बायकोच्या माहेरच्या माणसांशी संबधीत असला कि काही विचारू नका.

तयारीच्या शेवटच्या अंकात त्या देशाचे चलन घेतले जाते. एअरपोर्टला कसे व कधी पोहोचायचे हे ठरविले जाते. ओळखीच्या ड्राइव्हरवर विश्वास टाकला जातो. त्याला दहावेळा, जमले तर त्याच्या घरच्यांना वेळेवर येण्यासंबधी बजावले जाते. अलिकडच्या काळात वयोवृद्धांना  स्मार्टफोन वापरून फुकट उपलब्ध असणारे वायफाय कसे वापरावे, व्हाट्सअँपच्या सहाह्याने मेसेज कसे पाठवावेत हे शिकवणे व त्याची वारंवार उजळणी करणे हि कामे घरातील लहान मुले छान करून घेतात. स्वयंचलित जिन्यावरून कसे उतरावे, चढावे यासाठी मॉलमध्ये जाऊन प्रात्यक्षिक घेतले जाते. 

सरतेशेवटी त्यादिवसाची सुरुवात सूर्यनारायणाच्या साक्षीने होतो, गाडीत बसल्यापासून सोशल साईटवर अपडेट पाठविले जातात. ‘हायवेला लागलो, विमानतळावर पोहोचलो, सामान तपासणी झाली’, अगदी आपण कुठल्या लाउंजचा फुकट वायफाय वापरात आहोत हेही सांगितले जाते.
विमानतळावर निर्गमन द्वारावर प्रतीक्षा करणाऱ्यांचा चेहरा बरेच काही सांगून जात असतो. विशेषतः विमानास उशीर झाला तर अगदी घरी जेवायला येणाऱ्या पाहुण्यांची वाट पाहणाऱ्या यजमानांसारखा असतो,”लवकर ये रे बाबा, भूक लागली आहे”. तोपर्यंत ऐअर होस्टेस व पायलट यांना पाहून मनाचे समाधान करावे लागते. 

विमानात बसण्याची घोषणा होताच, देवळात दर्शनासाठी असते तशी रांग लावली जाते. काहीजण पटकन रांगेत थांबतात, काही मात्र ” मी शेवटीच जाणार, मला घेतल्याशिवाय तुम्ही कसे जाणार” अशी जाणीव सर्वांना करून देतात. सरतेशेवटी कुठलाही रुमाल न टाकता स्वतःच्या जागेवर जाऊन बसले की जे मस्त समाधान मिळते, त्याचे शब्दात वर्णन अशक्य आहे. याच आनंदात जमेल व आठवेल त्या सर्व देवांना प्रार्थना करून प्रवासाची सुरुवात होते.

एकंदर, या छोट्या कालावधीत माणसाच्या आयुष्यात भरपुर उलथापालथ होते. रोजच्या धावपळीत मरगळलेल्या मनाला नवी उभारी येते, नवचैतन्य लाभते  म्हणुन जमेल तेव्हा परदेशवारी कराच….  

..अनिरुद्ध शिर्के

जपु या नाती….

“हे अस काय म्हणु राहिलीस तु आई, मी हाय ना” ICU च्या वेटींग रुममध्ये मुलगी आईला समजावून सांगत होती. नवऱ्याच्या आजारपणात खचलेल्या त्या मातेला लेक समाजावत होती. त्यांच्या ग्रामीण भाषेतील संवादाने मनात विचारांचे काहूर माजले होते.

कठीण प्रसंग उभे ठाकले की भौतिक सुखे नकोशी वाटु लागतात. हवीहवीशी वाटतात ती फक्त जपलेली नाती, मग ती रक्ताची असो वा नसो.” संकटात साथ देतो तोच आपला..” वगैरे तत्सम विचार पटायला लागतात. थोडक्यात माणूस एकटा पडला, दुःखाची सावली जरी पडली की गरज लागते ती एका आधाराची, एका नात्याची.

किती आणि कशी असतात ही नाती ? काही रक्ताची, काही आपुलकीची तर काही माणुसकीची…

बाहेरजगात कितीही तणावात असलो तरी घरात पाऊल टाकताक्षणीच समोर दिसणारी निरागक मुले, त्यांचा हसरा चेहरा सर्व तणाव, दुःख कुठल्याकुठे पळवुन लावतात. काय विलक्षण जादु आहे या नात्यात.

वयात आलेल्या मुलाला काही तरी सांगायचे आहे, त्याच्या मनात काहीतरी विचार चालू आहेत, पण तो व्यक्त होत नाही. हे त्याच्या आईवडिलांना न सांगतादेखील अगदी सहज कळते. नात्याची वेगळीच जादु.

सहज भेटलेले काही अपरिचित असुनही अगदी आपले वाटु लागतात. मनाच्या कोपऱ्यात घर करतात. त्यांचा कुठलातरी गुण मनाचा ठाव घेतो. आणि मग आयुष्यभर सोबत असणारे मैत्रिचे नाते तयार होते. सहज हाक द्यावी आणि त्यांनी उभे रहावे अशी जादु मैत्रिच्या नात्यातच अनुभवता येते.

नवीन नोकरी लागली अथवा राहते घर परिसर बदलल्यास सुरवातीला अनोळखी वाटणारी माणसे काही दिवसात छान सोबती, शेजारी होतात. मनातील दुरावा कुठल्याकुठे पळुन जातो. मग कठीण प्रसंगी हेच प्रथम धाऊन येतात. अशीही नाती वेगळीच म्हणा.

अनेक वर्षे संसार केलेल्या नवरा बायकोच्या नात्याची खरी मज्जा उतारवयातच आहे. आपल्या जोडीदाराला काय हवे काय नको याची जाणीव नकळत होत असते. प्रदीर्घ अनुभव पाठीशी असल्याने समोरच्याच्या मनातील भावना, विचार न सांगता देखील सहज कळतात. बघा ना विश्वासाच्या नात्याची जादु.

थकलेल्या आई वडिलांना मुलांचे पैसे नको असतात, त्यांना हवा असतो त्यांच्या प्रेमाचा ओलावा. आयुष्यातील चढ उतारांनी त्यांना क्षणभंगुर जिवनाचा खरा मंत्र उमजलेला असतो. अश्या वेळेस मुलांनी दिलेली आदरपुर्वक वागणुक, साथ त्यांचा उत्साह दुणावत असतो. प्रेमाचे नाते केवळ असेच व्यक्त होऊ शकते.

रस्ताने चालताना एखाद्यावर अचानक काहीतरी प्रसंग ओढावतो. तत्काळ मदत आवश्यक असते. तेवढ्यात कुठूनतरी एक मदतीचा हात येतो. रुग्णवाहिका, डॉक्टर, आजुबाजुला असलेली माणसे कोणीतरी माध्यम असते, माणुसकीचे नाते जिवंत ठेवण्याचा प्रयत्न असतो तो.

नाही म्हणा सध्याच्या तांत्रिक जगात अशा अनेक नात्यांपासुन आपण जरा दूरावलो आहोत. काही वेळेस नाईलाजाने, एखाद्या शब्दाने, प्रसंगाने, गैरसमजातून तर काही वेळेस मनातील अढीने आपण कमी पडतो. थोडा प्रयत्न केला तर निश्चितच जपु शकू अशी अनेक नाती. चला तर स्वतःला या नात्यांचे महत्व समजावत, करू या एक प्रयत्न नाती जपण्याचा….
~अनिरुद्ध शिर्के