जपु या नाती….

“हे अस काय म्हणु राहिलीस तु आई, मी हाय ना” ICU च्या वेटींग रुममध्ये मुलगी आईला समजावून सांगत होती. नवऱ्याच्या आजारपणात खचलेल्या त्या मातेला लेक समाजावत होती. त्यांच्या ग्रामीण भाषेतील संवादाने मनात विचारांचे काहूर माजले होते.

कठीण प्रसंग उभे ठाकले की भौतिक सुखे नकोशी वाटु लागतात. हवीहवीशी वाटतात ती फक्त जपलेली नाती, मग ती रक्ताची असो वा नसो.” संकटात साथ देतो तोच आपला..” वगैरे तत्सम विचार पटायला लागतात. थोडक्यात माणूस एकटा पडला, दुःखाची सावली जरी पडली की गरज लागते ती एका आधाराची, एका नात्याची.

किती आणि कशी असतात ही नाती ? काही रक्ताची, काही आपुलकीची तर काही माणुसकीची…

बाहेरजगात कितीही तणावात असलो तरी घरात पाऊल टाकताक्षणीच समोर दिसणारी निरागक मुले, त्यांचा हसरा चेहरा सर्व तणाव, दुःख कुठल्याकुठे पळवुन लावतात. काय विलक्षण जादु आहे या नात्यात.

वयात आलेल्या मुलाला काही तरी सांगायचे आहे, त्याच्या मनात काहीतरी विचार चालू आहेत, पण तो व्यक्त होत नाही. हे त्याच्या आईवडिलांना न सांगतादेखील अगदी सहज कळते. नात्याची वेगळीच जादु.

सहज भेटलेले काही अपरिचित असुनही अगदी आपले वाटु लागतात. मनाच्या कोपऱ्यात घर करतात. त्यांचा कुठलातरी गुण मनाचा ठाव घेतो. आणि मग आयुष्यभर सोबत असणारे मैत्रिचे नाते तयार होते. सहज हाक द्यावी आणि त्यांनी उभे रहावे अशी जादु मैत्रिच्या नात्यातच अनुभवता येते.

नवीन नोकरी लागली अथवा राहते घर परिसर बदलल्यास सुरवातीला अनोळखी वाटणारी माणसे काही दिवसात छान सोबती, शेजारी होतात. मनातील दुरावा कुठल्याकुठे पळुन जातो. मग कठीण प्रसंगी हेच प्रथम धाऊन येतात. अशीही नाती वेगळीच म्हणा.

अनेक वर्षे संसार केलेल्या नवरा बायकोच्या नात्याची खरी मज्जा उतारवयातच आहे. आपल्या जोडीदाराला काय हवे काय नको याची जाणीव नकळत होत असते. प्रदीर्घ अनुभव पाठीशी असल्याने समोरच्याच्या मनातील भावना, विचार न सांगता देखील सहज कळतात. बघा ना विश्वासाच्या नात्याची जादु.

थकलेल्या आई वडिलांना मुलांचे पैसे नको असतात, त्यांना हवा असतो त्यांच्या प्रेमाचा ओलावा. आयुष्यातील चढ उतारांनी त्यांना क्षणभंगुर जिवनाचा खरा मंत्र उमजलेला असतो. अश्या वेळेस मुलांनी दिलेली आदरपुर्वक वागणुक, साथ त्यांचा उत्साह दुणावत असतो. प्रेमाचे नाते केवळ असेच व्यक्त होऊ शकते.

रस्ताने चालताना एखाद्यावर अचानक काहीतरी प्रसंग ओढावतो. तत्काळ मदत आवश्यक असते. तेवढ्यात कुठूनतरी एक मदतीचा हात येतो. रुग्णवाहिका, डॉक्टर, आजुबाजुला असलेली माणसे कोणीतरी माध्यम असते, माणुसकीचे नाते जिवंत ठेवण्याचा प्रयत्न असतो तो.

नाही म्हणा सध्याच्या तांत्रिक जगात अशा अनेक नात्यांपासुन आपण जरा दूरावलो आहोत. काही वेळेस नाईलाजाने, एखाद्या शब्दाने, प्रसंगाने, गैरसमजातून तर काही वेळेस मनातील अढीने आपण कमी पडतो. थोडा प्रयत्न केला तर निश्चितच जपु शकू अशी अनेक नाती. चला तर स्वतःला या नात्यांचे महत्व समजावत, करू या एक प्रयत्न नाती जपण्याचा….
~अनिरुद्ध शिर्के