“अरे ये ना मग. आत्ता येतोस का ? गप्पा मारू या ” मी थोडा निवांत आहे म्हटल्यावर माझ्या मित्राने लगेच ऑफर दिली.
एरवी निवांत वेळ मिळाला की आम्ही काहीही करतो.. अगदी काहीही. पुस्तक वाचन असो, मिळेल त्या वाहनाने मस्त भटकंती असो, वृध्दाश्रमात काही कामे करणे असो वा कॉलेजच्या रम्य😜 आठवणी जाग्या करत गप्पा मारणे असो, प्रत्येक वेळेस थकलेल्या मनाला रिफ्रेश करणे हेच उद्दिष्ट असते.
मात्र समाजात काही असेही रत्न आहेत ज्यांनी आपल्याकडील रिकाम्या वेळेला एक वेगळीच वाट दाखवली आहे.
आमचे महाजन काका (सध्या रिटायर्ड) रोज न चुकता सकाळी 6:30 ते 8 वाजेपर्यंत सोसायटीच्या सर्व शाळकरी मुलांना बसमध्ये रितसर बसवुन देतात. मुलांच्या पालकांना माहित नसेल एवढे त्यांना शाळा, बस, सुट्या यांचे वेळापत्रक माहित असते. सकाळच्या वेळी प्रत्येक पालकाला त्यांचा मोठा हातभार वाटतो.
आता औटीकाकाही बघा ना, 87 वर्षाचे तरूण🧚♂️, कुठलाही मोबदला मिळत नसताना सोसायटीचे सर्व कामे स्वतः करतात. कोणते बिल भरणा कधी करायचे हे तोंडपाठ, सरकारी दरबारी अर्ज भरण्यापासुन त्याचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत पाठपुरावा करणे हे जणु त्यांच्या रक्तातच आहे. प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवणे, प्रत्येकाला त्याचे टपाल आले आहे, पडुन आहे याची आठवण करून देणे अन प्रत्येकाला आठवणीने त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे यात त्यांचा कोणी हात धरू शकणार नाही. मनात घर करून राहतात अशी माणसे.
जगतापांच्या चंदुचे काही औरच, आईटी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर आहे तरीही रिकाम्या वेळात आयुर्वेदिक औषधे यावर संशोधन करीत राहतो. त्याच्या 200 स्क्वे. फुटाच्या गॅलरीत असंख्य दुर्मिळ वनस्पतींची उपस्थिती आहे. कुणी कशाने आजारी पडले की हा लगेच त्याची लक्षणे, काळजी यावर भरपुर माहिती पाठवतो, सोबत एक औषधी वनस्पती देतो. ज्ञान ही एकमेव गोष्ट जी वाटल्याने वाढते याचे उत्तम उदाहरण.
किशोरची जनसेवेसाठी कमिटमेंट लाजवाब. प्रायव्हेट कंपनीत नोकरी तरीही अनाथ, वंचित मुलांना शिक्षण मिळावे म्हणुन अखंड मेहनत घेतो.आजतागायत तब्बल 121 मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडली आहे. काहींची लग्नेदेखील यानेच लावील आहेत. याला म्हणतात कमिटमेंट.”एक बार कर दी…”
अपणा अरूणभाई तो एकदम मस्त कलंदर आदमी, ” फिरती सम्राट”, थोडा वेळ मिळाला की लगेच याची बाईकला किक आणि निघाला…’धुम मचाले’ करत… सबंध भारत पालथा घातला आहे पठठयाने. त्या PWDच्या अधिकारयांनाही त्याच्याएवढे रस्ते पाठ नसतील. पण प्रत्येक भटकंतीला किमान दोन नागरिकांच्या जेवणाची भ्रांत मिटवणार. त्यांच्या चेहरयावरील समाधानाची लकेर याचा उत्साह द्विगुणीत करते.
थोडक्यात रिकामा वेळ प्रत्येकाला असतोच त्याचा कसा वापर करायचा हे वैयक्तिक ठरेल. परंतु स्वतःबरोबर सामाजिक व्यवस्थेत आपण किमान खारीचे योगदान देऊ शकलो तर आनंदच आहे.
मी माझ्या रिकाम्या वेळात केलेले लिखाण आपण आपल्या रिकाम्या वेळेत वाचले याबद्दल आभारी.
आपल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग व्हावा हीच प्रार्थना.