तयारी परदेशवारीची

 …. (पुणेरी उपहास वारी )

परदेशात जायचे म्हटले कि प्रत्येक माणसाच्या मनात व पोटात वेगळ्याच गुदगुल्या होणे सुरु होते. जाण्याचा बेत ठरल्यापासून, तो दिवस उजाडेपर्यंत मित्रांना व नातेवाईकांना वेगवेगळ्या पद्धतीने ” परदेशी जातोय” हा निरोप दिला जातो. “अरे भेटलो असतो पण, मी …जातोय, अजून खूप कामे बाकी आहेत (यात बरेच इंग्रजी शब्द वापरून) , तर आल्यावर भेटू “. काहींचा प्रयत्न तर समोरच्याच्या मनात विचारांचे काहूर माजले पाहिजे असा असतो. त्याचा अपेक्षित परिणाम झाला कि समोरचे मित्रही उगाच आपल्यालाही वेगवेगळ्या देशांना भेट देता येईल का ? किती खर्च येईल ? कोणत्या कंपनीचे तिकिट स्वस्तात मिळेल हे पाहत बसतात.

सध्याच्या इंटरनेट युगात तर सोशल नेटवर्किंग साईटवर, प्रवासाच्या किमान महिनाभर अगोदरपासून सगळे विचार मांडले जातात, प्रगती कळवली जाते. कोणत्या दुकानातून काय खरेदी केले इथपासून तिकडे जाऊन काय खाणार सगळे सगळे विचार मांडले जातात. मध्येच एखाद्या गाडीवर वडापाव खाताना पोस्ट टाकून “वडापाव मिस करणार.. ” असेही सांगितले जाते. मग काय भराभर लाईक्स टाकल्या जातात.  

प्रथमच परदेशी जाणाऱ्यांना थोडासा अनुभव असणारे शेजारी, मित्र जातायेता चौकशी करत, सोबत भरपूर ज्ञान देऊन जातात. घरातील वयोवृद्ध प्रवास करणार असतील तर विचारू नका. तरुणाला लाजवतील अशी धावपळ करतात. सोबत काय नेता येईल याची प्रचंड यादी केली जाते. जोडीने जाणार असतील तर कधी नव्हे ते बायकोसाठी शुज आणले जातात. साडीऐवजी सलवार कमीज अथवा जीन्स टी शर्ट विकत आणून तीनदा आपण कसे दिसतो हे पाहिले जाते. पुरुषदेखील नवीन टी शर्ट घालून, आरश्यासमोर उभे राहून, पोटावरून हाथ फिरवत “जरा पोट कमी करावे लागेल” हे नम्रपणे कबुल करतात. खरी मज्जा येते ती बॅग भरतेवेळी, शाळेतल्या अल्लड मुलांप्रमाणे बॅगेला किती कप्पे आहेत, कुठल्या कप्यात काय ठेवता येईल हे तपासले जाते. ती बॅग रोज रात्री व्यवस्थित ठेवून सकाळी पुन्हा उघडली जाते. एखाद्या बॅगेला इतिहास असेल, आणि त्यातहि तो बायकोच्या माहेरच्या माणसांशी संबधीत असला कि काही विचारू नका.

तयारीच्या शेवटच्या अंकात त्या देशाचे चलन घेतले जाते. एअरपोर्टला कसे व कधी पोहोचायचे हे ठरविले जाते. ओळखीच्या ड्राइव्हरवर विश्वास टाकला जातो. त्याला दहावेळा, जमले तर त्याच्या घरच्यांना वेळेवर येण्यासंबधी बजावले जाते. अलिकडच्या काळात वयोवृद्धांना  स्मार्टफोन वापरून फुकट उपलब्ध असणारे वायफाय कसे वापरावे, व्हाट्सअँपच्या सहाह्याने मेसेज कसे पाठवावेत हे शिकवणे व त्याची वारंवार उजळणी करणे हि कामे घरातील लहान मुले छान करून घेतात. स्वयंचलित जिन्यावरून कसे उतरावे, चढावे यासाठी मॉलमध्ये जाऊन प्रात्यक्षिक घेतले जाते. 

सरतेशेवटी त्यादिवसाची सुरुवात सूर्यनारायणाच्या साक्षीने होतो, गाडीत बसल्यापासून सोशल साईटवर अपडेट पाठविले जातात. ‘हायवेला लागलो, विमानतळावर पोहोचलो, सामान तपासणी झाली’, अगदी आपण कुठल्या लाउंजचा फुकट वायफाय वापरात आहोत हेही सांगितले जाते.
विमानतळावर निर्गमन द्वारावर प्रतीक्षा करणाऱ्यांचा चेहरा बरेच काही सांगून जात असतो. विशेषतः विमानास उशीर झाला तर अगदी घरी जेवायला येणाऱ्या पाहुण्यांची वाट पाहणाऱ्या यजमानांसारखा असतो,”लवकर ये रे बाबा, भूक लागली आहे”. तोपर्यंत ऐअर होस्टेस व पायलट यांना पाहून मनाचे समाधान करावे लागते. 

विमानात बसण्याची घोषणा होताच, देवळात दर्शनासाठी असते तशी रांग लावली जाते. काहीजण पटकन रांगेत थांबतात, काही मात्र ” मी शेवटीच जाणार, मला घेतल्याशिवाय तुम्ही कसे जाणार” अशी जाणीव सर्वांना करून देतात. सरतेशेवटी कुठलाही रुमाल न टाकता स्वतःच्या जागेवर जाऊन बसले की जे मस्त समाधान मिळते, त्याचे शब्दात वर्णन अशक्य आहे. याच आनंदात जमेल व आठवेल त्या सर्व देवांना प्रार्थना करून प्रवासाची सुरुवात होते.

एकंदर, या छोट्या कालावधीत माणसाच्या आयुष्यात भरपुर उलथापालथ होते. रोजच्या धावपळीत मरगळलेल्या मनाला नवी उभारी येते, नवचैतन्य लाभते  म्हणुन जमेल तेव्हा परदेशवारी कराच….  

..अनिरुद्ध शिर्के