शब्दांकन: अनिरुद्ध शिर्के
“सो गया ये जहॅां, सो गया आसमां …” गाडीत ‘तेजाब’ चित्रपटाचे गाणे ऐकत चाललो होतो. गावावरून परतताना रात्रीचे 1 वाजले होते. निघायला जरा उशीरच झाला होता. अजुन दीड एक तासाचा प्रवास शिल्लक होता. नाही म्हणता कंटाळा आलाच होता. त्यात पाऊसाची रिपरिप चालु होती. साधारणतः 20 कि.मी. नंतर हायवे येणार होता.
आता उसाची क्षेत्र संपून बांबूची वने लागली होती. गाडीचा हेडलाईट पोहचेल एव्हढेच दिसतं होते. बाकी दाट झाडी व त्यांना कवटाळुन बसलेला अंधार यामुळे काहीच कळत नव्हते. देवदैठण गावचा ओढा पार केला. गाडी ओढ्यातुन वर काढली तसे रस्त्याच्या डाव्याबाजुला कोणी तरी उभे आहे असे वाटले. गाडी हळु करून बिमर मारून पाहिला.
एक पांढरा कुडता घातलेली स्त्री, बहुतेक ओढणीखाली हातात एक बाळ, हातात छत्री, सोबत एक कपड्यांची बॅग अश्या लवाजम्यासह उभी होती. एवढ्या पावसात, इतक्या रात्री, एखादी स्त्री, लहान बाळासह असे रस्त्यावर कसे काय उभी असेल ही शंका मनात आली. तेवढ्यात ती स्त्री गाडीपुढे आडवी आली व गाडी थांबवण्याची विनंती करू लागली.
मी एकदम गडबडुन गेलो, काय करावे? थांबु की नको. असे रात्री थांबणे योग्य आहे का? असा मनातील गोंधळ वाढला. एव्हाना गाडी तिच्यापर्यंत पोहोचणार की, मी एकदम करकचून ब्रेक लावला व गाडी थांबविली. माझा पुढे तोल गेला व स्टिअरिंगवर जाऊन आपटणारच होतो.. पण स्वतःला सावरले. हळुच समोर पाहिले तर …तर ती स्त्री गायब… पुरता हादरून गेलो…. कुठे गेली असेल हा विचारच करत होतो की डाव्या काचेवर कुणीतरी टक टक वाजवले. मी हळुच मान फिरवली तर तीच बाई( मुद्दाम स्त्री नाही म्हणत, कारण माझी अवस्था तशीच होती)…तीच बाई चेहरयावर स्मितहास्य करत दार उघड म्हणुन सांगत होती.
माझेही हात नकळत बटणाकडे गेले व गाडी उघडली. जणु कोणी माझा हात पकडून ते करून घेत होते. झटकण तिने दार उघडले. पण का कुणास ठाऊक त्या वेळी माझ्या गाडीचे दार ..’करररर…..ररररर’ असे वाजल्यासारखे वाटले. बाहेर पाऊस पडत होता परंतु एसी गाडीत मी घामाने भिजलो होतो. त्या बाईने अगोदर तिची बॅग ठेवली व नंतर ओढणीखालील बाळाला संभाळत स्वतः गाडीत बसली. धाडकन दरवाजा बंद केला.
‘बर झाल तुम्ही गाडी थांबवली, मी खुप वेळ वाट पाहत होते. पण एकही गाडी यायना. आली तर थांबणा. तुमची गाडी आली, तुम्ही थांबलात. माझ कामच झाल.’ असे बोलुन तिने एक पॉज घेतला. माझ्या काळजात एकदम धस्स झाले. आजपर्यंत पाहिलेले सगळे भूताचे चित्रपट, मालिका, त्यातले प्रसंग सगळ्यांची उजळणी होत होती. ‘तुमचे उपकार झाले पाहुण. चला आता.’ या तिच्या शेवटच्या वाक्याने जरा धीर आला. मी गाडी चालु केली. परंतु माझे डोके काम करत नव्हते. नको ते विचार मनात यायला लागले होते. कोण असेल ही ? एवढ्या रात्री काय करत असेल? नक्की माणूसच आहे ना ….की ..की भुत…
पुढे परत कोणी तरी वयोवृद्ध स्त्री, पुरूष उभे आहेत, हात करत आहे असे वाटले. तेवढ्यात तिने ‘अजिबात गाडी थांबवु नका, कुठ बी गाडी थांबवली तर चांगल नाही होणार ‘ असे फर्मान सोडले. मी फक्त मान डोलावली व गाडी भरधाव वेगाने पुढे घेतली. माझी चांगलीच बोबडी वळली होती. शब्दच फुटत नव्हते. खुप वेळ तसाच गेला.
‘तुम्ही काय पुण्याला चाललाय?’ त्या बाईच्या प्रश्नाने मी भानावर आलो. मी अडखळतच ‘अ.अम..हो…हो’ म्हटले व पुन्हा शांत बसलो. बराच वेळ शांत बसल्यावर तिने पुन्हा विचारले ‘मला कुठे जायचे ते नाही विचारले?’. पुन्हा शाॅक बसला. ते खरेच होते. मी तिला गाडीत घेतले परंतु कुठे जायचे हे विचारलेच नाही. त्यात तिची विचारायची पध्दत फारच वेगळी होती. सोबत एक तिरका कटाक्ष. खरेतर त्यावेळची माझी अवस्था वण॔न करण्यासारखी नव्हतीच. मी इतका घाबरलो होतो की मला गाणीही ऐकु येत नव्हती, गाडी चालु आहे का? असल्यास गाडीचा वेगही माहित नव्हता. फक्त पुढे फिरणारे वायपर दिसत होते व अॅकसलेटरवर पाय होता.
काही वेळाने गाडी हायवेला लागली. एक दोन ट्रक पास झाले, मग मी जरा भानावर आलो. तिच्याकडे हळुच बघितले तर ती बाई ओढणीआड बाळाला नीट करत होती. बाळ बहुतेक झोपले असावे कारण ते नीट दिसत नव्हते व त्याचा काहीच आवाज येत नव्हता. ‘मी हिला गाडीत का घेतले? कोण आहे? त्या ओढ्याच्यापुढे काय करत असेल? इतक्या रात्री कुठे चालली काही माहिती नाही? ‘ माझ्या मनात प्रश्नांची गर्दी वाढत होती.
मी घाबरतच विचारले, ‘तुम्ही कुठे राहता?’ तिने वळुन पाहिले व म्हणाली ‘विचारलाच का प्रश्न, नका काळजी करू. कळेलच लवकर’. पुन्हा छातीत धस्स झाले. काय उत्तर होते. या तिच्या उत्तरावर विक्रम वेताळही आठवुन झाले.
घोडनदी ओलांडून काही वेळ झाला असेल. तोच ‘गाडी जरा हळु करा, मला उतरायची जागा आली’ या तिच्या वाक्याने मी परत सावरलो. गाडी हळु केली. परंतु मला कुठेही वस्ती दिसेना. पुढे, डावीकडे, उजवीकडे सगळीकडे पाहत होतो. पण कुणाचा मागमूसही नव्हता.
एक वळण झाले व ‘गाडी थांबवा’ तिचा आदेश आला. मी गाडी बाजूला घेतली. तिने ताडकन दरवाजा उघडला. तिचे सगळे सामान घेऊन ती उतरली. परत एक कटाक्ष टाकत ‘तुम्ही इथेच थांबा. मी आलेच’ म्हणाली व ती वळाली. मी तिच्या पाठमोरया आकृतीकडे पाहत होतो. ती सरळ चालते ना, तिचे पाय सरळ आहेत की उलटे, हात किती लांब आहेत, जेवढे अगाध ज्ञान चित्रपट, मालिका यातुन मिळाले होते त्याआधारे पाहण्याचा प्रयत्न करत होतो.
रस्त्यापासुन जरा खाली असलेल्या वावरात एका घराच्या दिशेने ती गेली. रात्रीच्या भयाण शांततेत रातकिड्यांचा किर..किर.. आवाजही डिजेसारखा मोठा वाटत होता. ती घराजवळ गेली. तिने दरवाज्या वाजवला. थोड्या वेळाने दरवाजा उघडला गेला. ती आत गेली. परत भयान शांतता. आता पुढे काय? हा विचार चालू होता तितक्यात एक म्हातारा घरातुन बाहेर आला. हातात कंदील घेऊन तो काठी टेकवत माझ्याकडे आला. पाठोपाठ ती बाईही आली.
म्हातारयाने कपाळावर आठया पाडुन माझ्याकडे पाहिले. घसा खाकरून मला विचारले ‘एवढ्या रातच कुठ निघाल पावणं?’. मला त्यांचा आवाज ए के हंगल सारखा वाटला. मी काही बोलणार इतक्यात ‘ते पुण्याचं पावण हाईत’ ती बाई बोलली. पुन्हा छदम हास्य. याच हास्याने माझी गभ॔गळीत अवस्था केली होती.
‘अव इतक्या रातच्याला एकट नका फिरत जाऊ. जागा चांगल्या नाहीत.’ तो म्हातारा बोलु लागला तितक्यात ‘दिसलं की आम्हाला एक जोडप, हात करत होत, पण मीच गाडी नाही थांबु दिली’ ती बाई बोलली. ‘अहो, हि आमची लेक. तालुक्याच्या ठिकाणी असती. मुक्कामी एसटीने यायला निघाली तर एसटीचा घोटाळा झाला. पुढ पायी निघाली. कुणीबी तिच्यासाठी थांबणा.’ म्हातारे बाबा पोटतिकडीने सांगु लागले.’तुम्ही गाडी थांबवावी म्हणुन मी सोबत बाळ हाय अस खोट दावल’ त्या म्हातारयाला थांबवत मध्येच ती स्त्री म्हणाली ( हो स्त्री ..कारण आता माझे चित्त थारेवर येऊ लागले होते).
म्हणजे मला हिने वेडयात काढले होते. तिने कापडाचा गुंडाळा करून बाळ असल्याचं भासवल होत. तिच्या स्त्री चातुर्याचे मला कौतुक वाटु लागले होते. तरी बाळ हालचाल कसे करत नाही ही माझ्या मनातील शंका बरोबर होती. फक्त मी घाबरलो होतो म्हणुन सुचले नाही.
‘माझ्या पोरीला सुखरूप घरी पोहचवल. आज तुमच्या रूपात ईठठलच भेटला.’ असे म्हणुन त्यांनी हात जोडले. त्या म्हातारया आजोबांच्या डोळ्यात पाणी आले होते. एका बापालाच पोरीची खरी काळजी असते. तितक्यात त्या स्त्रीने हातातील एक पिशवी गाडीत ठेवली. ‘पपई आणि कणस हायेत. तुमच्या लेकराबाळांसाठी घेऊन जा. आत्याने दिले म्हणुन सांगा.’ त्या ताईचे ते उदगार ऐकुन मन भरून आले. मी ‘हो ताई ‘ म्हटले व मान डोलावली.’ ‘शिस्तीत जाऊ द्या ‘ त्या म्हातारया आजोबांनी आज्ञा केली.
मी जड अंतःकरणाने त्यांचा निरोप घेतला व तिथुन निघालो. गाडीच्या आरशात पाहिले ते दोघे बराच वेळ दिसत होते. त्यांच्या अनपेक्षित प्रेमाने माझे डोळे भरून आले होते. कुठे मी भुताटकीचा विचार करत होतो व कुठे संकटात सापडलेली ती ताई खंबीरपणे लढा देत होती. माझे मलाच हसु आले.
मुड बदलण्यासाठी गाणी लावली तर पुन्हा ‘सो गया ये जहॅां, सो गया आसमां …’ हेच गाणे लागले. पटकन ते बंद केले. एक मिनिट शांततेत गेला. याच गाण्यानंतर सगळा प्रसंग घडला होता. पुन्हा खळाळुन हसायला लागलो.
खरेतर त्या रात्रीच्या वेळी जग झोपले होते परंतु मी मानवी जीवनातील माणूसकीच्या रम्य पहाटेची चाहुल अनुभवत होतो.
समाप्त.